मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टीसंबंधीचे आदेश जारी

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-  माहे एप्रिल, 2020 ते माहे मे, 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 81 व माहे डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2021-21 जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव व तळा या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दि.21 डिसेंबर 2021 (मंगळवार) होणार आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 (भाग-2) मधील नियम 135 (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते. काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र काही निवडणूकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी घातक आहे.

त्यामुळे वरील वस्तुस्थिती पाहता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत:-

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदान असलेले कामगार अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.   ही सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीना लागू राहील (उदा. खाजगी कंपनी यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना निवासी हॉटले, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.).  अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवतल देता येईल. मात्र त्याबाबत संबधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.  

वर नमूद केल्यानुसार उद्योग, उर्जा व कामागार विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल यांची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल.

रायगड जिल्ह्यातील पाली, तळा, म्हसळा, पोलादपूर, माणगाव व खालापूर या नरगपंचायतीच्या कार्यक्षेत्रात  दि.21 डिसेंबर 2021 रोजी मतदारांना मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्यात येत आहे, तसेच पूर्ण दिवस सुट्टी देणे आस्थापना मालकांना शक्य नसल्यास पूर्वपरवानगी घेऊन दोन तासांची सवलत देण्यात यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक