जिल्ह्यातील बांधकाम व असंघटित कामगारांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर व कामगार उपायुक्त श्री.पवार यांचे आवाहन

 

 

अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यातील असंघटित कामगार वर्गाची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची विशेष मोहीम सुरू आहे, तरी जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी www.mahabocw.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त नोंदणी करावी तसेच असंघटित कामगारांनी जिल्ह्यातील नागरी सुविधा केंद्र/वैयक्तिक स्वरुपात URL-eshram.gov.in या संकेतस्थळावर ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व कामगार उपायुक्त, रायगड श्री.प्र.ना. पवार यांनी केले आहे.

या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील मु. पाली आंबेवाडी, पो. गोळवाडी या दुर्गम गावातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या आदिवासी कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याच्या उद्देशाने कामगार उप आयुक्त, रायगड-पनवेल कार्यालयामार्फत विशेष मोहीमही नुकतीच राबविण्यात आली.

 या मोहिमेंतर्गत ज्या वीटभट्टी कामगारांनी अद्याप इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केलेली नाही, अशा कामगारांना नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन करुन मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. त्याचबरोबर 78 नोंदीत कामगारांची मंडळाच्या माध्यमातून 'एचएलएल' संस्थेमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना अत्यावश्यक संचामधील सोलर टॉर्च, मॉस्कीटो नेट, प्लॅस्टिक मॅट, टिफीन, टिफीन बॉक्स, वॉटर बॉटल, गॅल्वनाइज टंक तसेच राज, हेअरींग प्रोटेक्शन, सेफ्टी हेल्मेट, मास्क, सेफ्टी हॅन्डग्लॉज, सेफ्टी हानेंस, रिफलेक्टर जॅकेट इत्यादीचे वाटप करण्यात आले.

     तसेच या विशेष मोहिमेंतर्गत असंघटित कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याबाबतही माहिती देण्यात आली. ज्या कामगारांकडे कागदपत्र उपलब्ध आहेत, अशा कामगारांना एकाच वेळी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने इमारत व इतर बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे प्रतिनिधी, नागरी सुविधा केंद्राचे प्रतिनिधी 'एच.एल.एल' वैद्यकीय संस्थेचे प्रतिनिधी तसेच मे. इंडो अलाईड फुड लि. व गुनिना संस्थेचे प्रतिनिधी हे यावेळी उपस्थित होते. जेणेकरुन या सर्व योजनांची माहिती, नोंदणी, लाभ व आरोग्य तपासणी करण्यात येईल.

 या विशेष मोहिमेत कामगार उपायुक्त प्र.ना. पवार, सहायक कामगार आयुक्त श्रीमती शितल कुलकर्णी,  व्यवस्थापक, जिल्हा नागरी सुविधा केंद्र, रायगड श्री. राजेश पाटील तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

00000000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक