ओमायक्रॉनचा वाढता प्रादूर्भाव अन् नव वर्ष साजरे करण्यासाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले सुधारित आदेश जारी

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.31(जिमाका):- करोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. राज्यात कोविड-19 ची प्रकरणेही वाढू लागली आहेत. आगामी काळात लग्नसराई, इतर सण आणि नवीन वर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या संख्येने लोक एकत्र येत आहेत.

या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणखी काही निर्बंध लादणे अत्यावश्यक आहेत.  नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी दि.31 डिसेंबर, 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्यानुषंगाने शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

मागील चार दिवसात रायगड जिल्ह्यात दि. 27 डिसेंबर 2021 रोजी एकूण 29 रुग्ण, दि. 28 डिसेंबर 2021 रोजी एकूण 48  रुग्ण तसेच दि. 29 डिसेंबर 2021 रोजी एकूण 88 रुग्णांची व दि.30 डिसेंबर 2021 रोजी 99 रुग्णांची कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी दि.31 डिसेंबर, 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आवाहन केले असून त्यांनी  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (1) (3) नुसार रायगड जिल्ह्याच्या हद्दीत खालील मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

करोनाच्या अनुषंगाने दि.31 डिसेंबर 2021 रोजी व दि.01 जानेवारी 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे.

मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या दि. 24 डिसेंबर 2021  रोजीच्या आदेशान्वये राज्यात दि. 25 डिसेंबर, 2021 पासून रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात यावे.

कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे दि. 27 नोव्हेंबर 2021 च्या परिपत्रकाअन्वये देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच शासन आदेश मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई  दि.24 डिसेंबर 2021 अन्वये देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

दि.31 डिसेंबर 2021 व नूतन वर्ष, 2021 चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्क्केच्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल,

नियमानुसार परवानगी मिळालेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.

करोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे.

दि.31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

 विशेषत: रायगड जिल्ह्यातील अलिबाग, किहीम, वरसोली, नागाव, रेवदंडा, काशीद, मुरुड, श्रीवर्धन इ. समुद्र किनारे/चौपाटी ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करु नये. करोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशा वेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

कोविड- 19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील.

तसेच या परिपत्रकानंतर व दि.31 डिसेंबर 2021 व नूतन वर्ष, 2022 सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार हे आदेश काढण्यात आले असून पोलीस, आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक, करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापनामधील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू नसतील.

या आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती/आस्थापना शासनाने यापूर्वी लागू केलेनुसार दंडात्मक कारवाईस तसेच भारतीय दंड संहिता कलम 188, 269, 270, 271  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक