राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत इच्छुकांना प्रशिक्षण

 

अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका):- केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री Multipurpose Artificial Insemination Worker in Rural India ( MAITRI) अंतर्गत राज्यातील गायी, म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होईल, यामुळे दुग्ध उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल, यासाठी इच्छुकांना प्रशिक्षण द्यायचे आहे व प्रशिक्षित व्यक्तीची कृत्रिम रेतन व अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती करायची आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम 3 महिने कालावधीचा असून यामध्ये एक महिना अंतर्गत प्रशिक्षण पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये तर 2 महिने प्रात्यक्षिक प्रशिक्षण जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय या ठिकाणी देण्यात येईल.

हे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण झालेला असावा. त्याचे वय 18 ते 35 वर्ष असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होईल.

रायगड जिल्ह्याकरिता सर्वसाधारण प्रवर्गातून 5, अनुसूचित जाती प्रवर्गातून 1 व अनुसूचित जमाती प्रवर्गातून 2 याप्रमाणे एकूण 8 उमेदवारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.

तरी इच्छुक उमेदवारांनी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ.सुभाष म्हस्के व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद डॉ.श्याम कदम यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक