मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा जास्तीत जास्त इच्छुकांनी लाभ घ्यावा --‍ जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

 



 

अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- राज्यातील युवक-युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्याद्वारे ग्रामीण व शहरी भागात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे या उद्देशाने शासनाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

मा.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा कार्यक्रम समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.विजयकुमार कुलकर्णी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी  श्री.नित्यानंद पाटील, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग पेण श्रीमती शशिकला अहिरराव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक श्रीमती वर्षा पाटील,  जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री.श्यामकांत चकोर आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी मा.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा कार्यक्रम समितीची बैठक यापुढे दर पंधरा दिवसांनी आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या यांना दिले.  तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि समाज कल्याण विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, आदिवासी विकास विभाग व खादी ग्रामोद्योग मंडळाकडील योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीकरिता गुरुवार, दि.30 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा नियोजन भवन येथील सभागृहात  जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचित केले.

 या बैठकीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सन 2021-22 करिता जिल्हा उद्योग केंद्राकरिता 119 प्रकरणे,  खादी ग्रामोद्योग मंडळाकरिता 62 प्रकरणांचे उद्दिष्ट वाटप करण्यात आले असून  सन 2021-22 वर्षाकरिता दि.23 ऑगस्ट 2021 रोजी पहिल्या कार्यकाळ समितीद्वारे 241 प्रकरणे बँकेकडे मंजूरीकरिता शिफारस करण्यात आली आहेत. तर आज दि. 14 डिसेंबर 2021 रोजी आयोजित या वर्षातील दुसऱ्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे एकूण 103 प्रकरणांची बँकेकडे मंजूरीकरिता शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या यांनी दिली.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक