मराठी भाषा संवर्धनासाठी आपण सारे होऊ कटिबद्ध..! -पत्रकार नागेश कुलकर्णी

 


 

अलिबाग,दि.14 (जिमाका) :- शासनाने दि.14 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे नियोजन केले आहे. शासनाच्या या स्तुत्य उपक्रमात समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावे, तुम्ही-आम्ही सारे या निमित्ताने मराठी भाषा संवर्धनासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष श्री.नागेश कुलकर्णी यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमाचा दिमाखदार उद्घाटन कार्यक्रम कोविड मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार विशाल दौंडकर व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

श्री.नागेश कुलकर्णी पुढे म्हणाले की, मराठी भाषा आपला स्वाभिमान आहे. आपल्या मातृभाषेतूनच आपल्या मुलांची आकलन शक्ती अधिक प्रभावीपणे वाढीस लागते. आपल्या सर्वांना आपल्या मातृभाषेचा अभिमान आवश्यकच आहे, त्यासाठी आपल्या मातृभाषेच्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सारे कटिबद्ध होऊ या. याकरिता जिल्ह्यातील ग्रंथालये महत्त्वाची भूमिका निभावू शकतील. जिल्ह्यात जवळपास 8 ग्रंथालये शंभर वर्षाहून अधिक परंपरा असलेले आहेत तर एकूण ग्रंथालये 78 आहेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमात ग्रंथालय व ग्रंथालय चळवळीशी संबंधित सर्व नागरिक सहभागी होतील, असेही ते शेवटी म्हणाले.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे प्रयोजन, यानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत कोण-कोणते उपक्रम राबविले जाणार आहेत, याविषयीची माहिती उपस्थितांना दिली. जिथे कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून कार्यक्रम आयोजित करणे शक्य आहे तिथे काही कार्यक्रम राबविले जातील तर बाकी सर्व कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी मराठी भाषेचे दैनंदिन जीवनातील व प्रशासकीय कामकाजातील व्यावहारिक महत्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांचीही माहिती दिली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाचा तळमजला खूपच देखण्या रीतीने सजविण्यात आला होता. मराठी भाषेचे महत्व अधोरेखित करणाऱ्या रांगोळ्या, भित्तीचित्रे, पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले तर सांगता पसायदानाने करण्यात आली. सूत्रसंचालन तहसिलदार विशाल दौंडकर यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक