वरसोली-अलिबाग येथे पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमाचे रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

 


अलिबाग,दि.28 (जिमाका):- पर्यटन क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई यांच्यावतीने दि.28 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 या कालावधीत 5 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिराचे अलिबाग येथील मराठी शाळा, ग्रामपंचायत कार्यालय वरसोली येथे आयोजन करण्यात आले आहे. या पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन श्री.रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.

यावेळी वरसोली ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती प्रमिला भाटकर, पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री.हनुमंत हेडे, आय.आय.टी.टी.एम, ग्वाल्हेर चे डॉ.रमेश देव्रथ, दि स्काय हॉटेलचे संचालक श्री.अभिजीत कवळे आणि ग्रामपंचायत वरसोलीचे सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी श्री.रघुजीराजे आंग्रे म्हणाले की, पर्यटन म्हणजे फक्त समुद्र, मच्छी थाळी आणि घोडागाडी सफर नव्हे, तर त्या भागातील संस्कृती, इतिहास, लोकजीवन आणि निसर्गसंपदा यांची ओळख असते. ईश्वराने आपल्या कोकणावर निसर्ग, प्राणी, पक्षी यांची विपुल प्रमाणात उधळण केली आहे. त्याचबरोबर अर्वाचीन आणि मध्ययुगीन इतिहासाशी संबंधित अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. आक्षी येथील आद्य मराठी शिलालेख हा आपल्या सांस्कृतिक वारसाचा एक अमूल्य ठेवा आहे. वसई येथील पोर्तुगीज राजसत्ता, धर्मसत्ता यांचे आक्रमण चिमाजी आप्पा यांनी उखडून काढले, त्या युद्धात या परिसरातील अनेक वीरांनी सरखेल मानाजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखालील आरमारात योगदान दिले होते. या आरमाराच्या योगदानाप्रती कृतज्ञता आणि पराक्रमाचे विजयी प्रतीक म्हणून वसईच्या चर्चवरील एक घंटा मराठा आरमाराला प्रदान करण्यात आली होती. सरखेल मानाजीराव आंग्रे यांनी ती घंटा येथील खंडोबा देवस्थानास अर्पण केली. ही आणि अशी अनेक उदाहरणे आपल्या परिसरात उपलब्ध आहेत. येणाऱ्या पर्यटकांना अशी विविध वैशिष्ट्य उलगडून दाखविल्यास त्यांची येथील समाजजीवनाशी सांस्कृतिक नाळ जुळेल. पर्यटकांच्या रुपात लक्ष्मी आपल्या दारात उभी आहे, तिचे स्वागत करून घरात घेणे वा दार लावून नाकारणे हे आपल्यावरच अवलंबून आहे. या संधीचा सुयोग्य वापर करून प्रशिक्षणार्थ्यांनी तिचे सोने करावे, असे आवाहन करून त्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी पर्यटन कोकण विभागाचे उपसंचालक श्री.हनुमंत हेडे म्हणाले की, स्थानिक युवकांना पर्यटक गाईड प्रशिक्षण देऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे गाईड हा पर्यटन स्थळ परिसरातील अत्यंत अचूक आणि महत्त्वाची माहिती देत असतो. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि आलेल्या संधीचा योग्य उपयोग करावा.

या प्रशिक्षण कालावधीत पर्यटन संचालनालयामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्रेही देण्यात येणार आहे, असेही पर्यटन उपसंचालक श्री.हेडे यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक