रोहा, तळा तालुका हद्दीतील खाडीपट्ट्यात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाची यशस्वी कारवाई

 

 अलिबाग, दि.23 (जिमाका):- रोहा, तळा तालुका हद्दीतील कांडणे खुर्द ठिकाणी अलीकडच्या काळात काही व्यक्तींकडून अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू होती. स्थानिकांना रोजगार नाही, बाहेरचे रेती व्यावसायिक अवैध रेती उत्खनन करीत असल्याने सक्शन पंपावर जप्तीची कारवाई करावी, अशा तक्रारी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच रोहा प्रांताधिकारी डॉ.यशवंतराव माने यांच्याकडे प्राप्त झाल्या. यापूर्वी कुंडलिकेच्या खाडीपट्ट्यात महसूल विभागाने अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरूद्ध धडक कारवाई केली होती.

आताही प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेवून, मंगळवार, दि.22 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने यांच्या आदेशान्वये तहसिलदार कविता जाधव व त्यांच्या पथकाने सर्वात मोठी कारवाई केली. या पथकाने केलेल्या कारवाईत 4 सक्शन पंप, 7 होड्या जाळून नष्ट करण्यात आल्या. महसूल पथकाने कांडणे खुर्द, खाजणी खाडीपट्ट्यातील रेती उत्खनन यंत्रणेवर धडक कारवाई केल्याने बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांना अवैध गोष्टी थांबविण्याचा थेट इशाराच मिळाला आहे.

तळा मुख्यतः रोहा कुंडलिका, भालगाव खाडीपट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध रेती उत्खनन व रात्री उशिरा अवैध रेती वाहतूक सुरू होती. विभागातील स्थानिकांना रोजगार नाही त्यातच काही व्यावसायिकांनी अवैध रेती उपसा सत्र सुरूच ठेवले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी तहसिलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी भरत गुंड, तलाठी श्री.राऊत, विशाल चोरगे यांनी खाजणी घटनास्थळी पाहणी केली अन् धडक कारवाईला सुरूवात केली. या कारवाईत त्यांना खाडीकिनारी 4 सक्शन पंप, 7 होड्या आढळून आल्या. 4 होड्यांमध्ये रेती होती. या पथकाने तातडीने पंचनामा करून 4 सक्शन पंप, 7 होड्या जाळून निकामी करून टाकल्या. कांडणे खुर्द, खाजणी खाडीपट्ट्यातील अवैध रेती उत्खननावर महसूल विभागाने प्रथमच ऐतिहासिक धडक कारवाई केली. होड्या, सक्शन पंप जाळण्याची कारवाई केल्याने सबंधितांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू ठेवता येणार नाहीत, असा सज्जड इशारा प्रांताधिकारी डॉ.यशवंतराव माने यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना दिला आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक