दिव्यांग व्यक्तींनी महा-शरद (MAHA-SHARAD) वेब पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन - मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

अलिबाग, दि.23 (जिमाका):- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 मधील कलम 2 (झेडसी) अन्वये दिलेल्या परिशिष्टामध्ये दिव्यांगत्त्वाचे 21 प्रकार आहेत. दिव्यांग व्यक्तींना त्यांचे जीवन जगणे सुलभ व्हावे, यासाठी विविध सहाय्यक उपकरणांची आवश्यकता असते. जेणेकरून ते त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करू शकतील व जनसामान्यांप्रमाणे जीवन जगू शकतील. त्यांना दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी कोणत्या सहाय्यक उपकरणांची आवश्यकता आहे, हे जाणून घेण्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय चाचणी करून घेणे व त्या आधारे सहाय्यक उपकरणे निश्चित करणे आवश्यक असते.

समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना या दिव्यांगांना सुगम्यता प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनांचा पुरवठा करू इच्छितात. त्यासाठी दानशूर व्यक्ती व दिव्यांग लाभार्थी यांच्यामध्ये दुवा साधला जाण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींमध्ये जनजागृती करून त्यांची माहिती उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष न्याय विभागाने "महा-शरद वेब पोर्टल" वर नोंदणी करण्याचे अभियान सुरू केलेले आहे.

याकरिता दिव्यांग व्यक्ती तसेच दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटनांची नोंदणी www.mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे आहे. याकरिता दिव्यांग व्यक्तींकडे केंद्र शासनाच्या वैश्विक ओळखपत्र प्रणालीअंतर्गत (UDID | Card) असणे आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थाकडून या प्रणालीव्दारे मदत करण्यात येईल, त्यांना आयकरामध्ये 80-जी अंतर्गत सूट असेल.

तरी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती व दानशूर व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थांनी www.mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक