राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षा 04 जून 2022 रोजी

अलिबाग,दि.14 (जिमाका):- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त्त इयत्ता 8 वी साठीची प्रवेश पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा शनिवार, दि.04 जून 2022 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच होती परंतु आता ही परिक्षा मुलींनाही देता येणार आहे. गणित या विषयाची परीक्षा 200 गुणांची असून वेळ सकाळी 9.30 ते 11.00, सामान्य ज्ञान या विषयाची परीक्षा 75 गुणांची असून वेळ दुपारी 12.00 ते 01.00 आणि इंग्रजी या विषयाची परीक्षा 125 गुणांची असून वेळ दुपारी 2.30 ते 4.30 अशी असणार आहे. लेखी परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मौखिक परिक्षेबाबतचे वेळापत्रक यथावकाश कळविले जाईल.

प्रवेश वयाची अट:- या परीक्षेसाठी विद्यार्थी/विद्यार्थीनीचे वय 01 जानेवारी 2023 रोजी 11 वर्ष 06 महिने पेक्षा कमी आणि 13 वर्षापेक्षा अधिक नसावे, म्हणजेच विद्यार्थी-विद्यार्थीनीचा जन्म दिनांक 02 जानेवारी 2010 च्या आधीचा आणि दिनांक 01 जुलै 2011 च्या नंतरचा नसावा.

शैक्षणिक पात्रता:- विद्यार्थी/ विद्यार्थीनी उमेदवार दि. 01 जानेवारी 2023 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी च्या वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा.

परीक्षा शुल्क: आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून आपण मागवू शकता. परिक्षेसाठी कमांडट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी फॉलेज, डेहराडून उत्तराखंड, यांच्याकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाचे आहे. सर्वसाधरण संर्वगातील विद्यार्थी उमेदवाराकरिता रु. 600/- चा डीडी व अनुसूचित जाती/जमाती करिता रु.555/- चा डीडी कमांडंट, राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेज, डेहराडून, स्टेट बँक ऑफ इंडिया, तेल भवन, डेहराडून, बँक कोड नं. (01576) यांच्या नावाने काढावा. हा डी.डी. कमाडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड 248003 या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती/जमाती करिता डी.डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत/छायांकित प्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी.डी. पाठविताना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे, तो पत्ता, पिन कोडसह अचूक नमूद करावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तिका स्पीड पोस्टाद्वारे आपण दिलेल्या पत्यावर प्राप्त होईल. ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरिता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rimc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आवेदनपत्राची (फॉर्मची) मागणी आपणास करता येईल.

आवेदनपत्र परिपूर्ण भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 17 डॉ.आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ, पुणे 411001 या पत्त्यावर दि.25 एप्रिल 2022 पर्यंत पोहोचतील, अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत. अंतिम मुदतीनंतर आलेले आवेदनपत्र (फॉर्म) कोणत्याही परिस्थितीमध्ये स्विकारले जाणार नाहीत, याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी.

केंद्र शासनाच्या नोकरीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले/मुली लेखी आणि मौखिक परीक्षा ज्या राज्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांची पोस्टींग आहे, त्या ठिकाणी परिक्षा देऊ शकतात. त्या मुलांची निवड त्यांच्या मूळ अधिवास राज्यानुसार होईल आणि त्यांची उमेदवारी देखील त्यांच्या मूळ अधिवासाच्या स्थितीनुसार असेल. उमेदवार (विद्यार्थी/विद्यार्थीनी) ज्या राज्यातून परीक्षा देऊ इच्छितात, त्याच राज्यात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

आवेदनपत्र कसे भरावे:- आवेदनपत्र (फॉर्म) 2 (दोन) प्रतींमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जन्म दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी), अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी), अधिवास (Domicile Certificate) प्रमाणपत्र छायाप्रत (झेरॉक्स कॉपी), शाळेच्या बोनाफाईट सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे, आवेदनपत्रासोबत विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आधारकार्ड छायाप्रत, आवेदनपत्र भरताना 4 पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहे. त्यापैकी 2 फोटो आवेदनपत्रावर (फॉर्मवर) चिकटवून त्याखाली उमेदवाराने (विद्यार्थ्याने) स्वाक्षरी करावी व 2 फोटोच्या मागे नाव व स्वाक्षरी करून फॉर्मसोबत जोडावीत. या कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत साक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत) जोडावेत. ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक असून ते जमा न केल्यास विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे आवेदनपत्र (फॉर्म) रद्द करण्यात येईल, याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-01 च्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक