माणगाव विभागीय क्रीडा संकुल येथे 100 युवा क्षमतेचे "युवा वसतिगृह" स्थापण्यास शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान


अलिबाग,दि.1(जिमाका):- राज्याचे युवा धोरण 2012 मध्ये युवा वसतिगृह स्थापन करणे, ही एक महत्त्वाची बाब अंतर्भूत आहे. संबंधित युवा वसतिगृह प्राधान्याने विभागीय क्रीडा संकुलाच्या ठिकाणीच जागा उपलब्धतेनुसार विकसित करण्यात यावे, असे शासनाचे निर्देश आहेत.  या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यासह कोंकण विभागातील युवकांना भावी आयुष्याच्या जडणघडणीसाठी परीक्षा, प्रशिक्षण, मुलाखती, शिबिरे, चर्चासत्रे या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतावाढीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी हक्काचे निवासस्थान माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुलातच स्थापण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

कोकण विभागीय क्रीडा संकुल रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील मौजे नाणोरे येथे उभारण्यासंदर्भात शासनाकडून अलिकडेच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी पुरेशी, पोषक व सर्वच दृष्टीने अनुकूल जागा उपलब्ध असल्याने येथे युवा वसतिगृह उभारावे, अशी आग्रहाची विनंती पालकमंत्री कु.तटकरे यांनी शासनाला केली. ही विनंती मान्य करीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री.सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने दि.24 नोव्हेंबर 2021 रोजी मंत्रालयात संपन्न झालेल्या बैठकीत माणगाव येथे "युवा वसतिगृह" उभारण्यास मान्यता दिली आहे.  

अशा प्रकारे जिल्ह्याच्या विविध विकासकामांच्या यादीत आणखी एका लोकोपयोगी महत्त्वपूर्ण बाबीचा समावेश झाला आहे. पालकमंत्री कु.तटकरे यांच्याकडून जिल्ह्याच्या विकासकामांना शासनाकडून मंजुरी व त्यासाठी आवश्यक निधी मिळवून आणण्याचा धडाका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. एकूणच कोकण विभाग अन् जिल्ह्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.  

राज्याचे युवा धोरण 2012 नुसार शासनाच्या 28 एप्रिल 2014 च्या शासन निर्णयान्वये "युवा वसतिगृहाची स्थापना" ही योजना कार्यान्वित करण्यात आली. राज्यातील युवांना भावी आयुष्याच्या जडणघडणीसाठी परीक्षा, प्रशिक्षण, मुलाखती, शिबिरे, चर्चासत्रे यामध्ये सहभागी होता यावे तसेच राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी आयोजित उपक्रमांमध्ये युवकांना सहभागी होता यावे, या दृष्टीने युवांना हक्काचे निवासाचे स्थान उपलब्ध व्हावे, यासाठी वसतिगृहांची निर्मिती करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन शासनाने ही योजना सुरू केली आहे.

त्यानुसार राज्यात प्रत्येक महसूल विभागाच्या ठिकाणी रुपये चार कोटी निधीच्या मर्यादेत कोकण, नाशिक, पुणे,औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागाच्या ठिकाणी सुसज्ज असे युवा वसतिगृह निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय प्रतिवर्षी 12 लाख इतका व्यवस्थापन खर्चही देण्यात येणार आहे. तसेच या वसतिगृह उभारणीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती उभारणी व व्यवस्थापन प्रक्रिया करणार आहे.

या वसतिगृहामध्ये 100 युवांची निवास व्यवस्था असेल. युवक-युवती यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी ई-लायब्ररी, फर्निचर, कॅन्टीन, कॉन्फरन्स हॉल, दूरदर्शन संच, संगणक इत्यादी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 100 युवांची बैठक व्यवस्था होईल, असे अद्ययावत सभागृह यात असणार आहे.याचा वापर चर्चासत्र, बैठका, स्लाईड-शो, परिसंवाद, युवांच्या कलागुणांचे सादरीकरण इत्यादीसाठी करता येणार आहे. वसतिगृहातील काही कक्ष वातानुकूलित करण्यात येणार आहेत जेणेकरून राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय उपक्रमासाठी येणाऱ्या युवांसाठी निवासाची उत्तम सोय म्हणून याचा वापर करता येईल. या वसतिगृहामध्ये 16 ते 35 वयोगटातील युवांना प्रवेश दिला जाणार आहे तसेच येथील युवा उपक्रमांमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागी होणारे केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी-कर्मचारी, निमंत्रित, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी इत्यादींना प्रवेश दिला जाणार आहे. युवा वसतिगृहामध्ये महिलांसाठी 30 टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात येणार असून महिलांसाठी वेळप्रसंगी ज्यादा कक्ष प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येतील.

कोकण विभागातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव येथे विभागीय क्रीडा संकुल आणि त्याचबरोबर युवा वसतिगृह उभारल्यामुळे संपूर्ण कोकण विभागातील तसेच रायगड जिल्ह्यातील युवांना व खेळाडूंना विविध क्रीडा सुविधा मिळण्याच्या दृष्टीने याचा निश्चितच लाभ होणार आहे. या युवा वसतिगृहाच्या माध्यमातून अनेक युवक-युवतींची भविष्यातील वाटचाल अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक