सन 2022-23 मध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम सुरू


अलिबाग,दि.02 (जिमाका):- बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम दि.01 ते 20 मार्च 2022 या कालावधीत व्यापक स्वरूपामध्ये राबविण्यात येत आहे. आपल्या परिसरातील अशा शाळाबाह्य बालकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील 02141-227452 व 8275152363 या संपर्क क्रमांकांवर द्यावी किंवा नजीकच्या तहसील कार्यालयास / पोलीस ठाण्यास कळवावी तसेच नागरिकांनी या शोध मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व शिक्षणाधिकारी ज्योती शिंदे-पवार यांनी केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार 2009 राज्यात दि.01 एप्रिल 2010 रोजी लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. शाळेत कधीही दाखल न झालेली तसेच शाळेत न जाणारी बालके, ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्या बालकांनी प्रवेश घेवून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नसेल अशा 6 ते 14 वयोगटातील बालक एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहत असेल तर त्या बालकांना शाळाबाह्य बालक म्हणावे, अशी व्याख्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार केली आहे. साधारणत: सप्टेंबरनंतर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कुटुंबे स्थलांतर करीत असतात.

मागील दोन वर्षात कोविड-19 या जागतिक रोगाच्या प्रादूर्भावामुळे शाळा बंद होवून विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणामध्येही अडथळा निर्माण झाला. या कालावधीत अनेक कुटुंबाचे स्थलांतर झालेले असून 6 ते 14 वयोगटातील अनेक बालके शाळाबाहय झाल्याचे दिसून येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम दि.01 ते 20 मार्च 2022 या कालावधीत व्यापक स्वरूपामध्ये राबविण्यात येत आहे. या कालावधीत गावात व शहरात तसेच परिसरातील गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्टेशन, बसस्थानके, ग्रामीण भागातील बाजार, गुऱ्हाळ घर, गावाबाहेरची पालं, वीटभट्टया, दगडखाण, कोळसा खाणी, शेतमजूरी, बांधकाम व्यवसाय स्थलांतरीत कुटुंबे, झोपडया, फूटपाथ, सिग्नलवर / रेल्वेमध्ये फुले व अन्य वस्तू विकणारी तसेच रस्त्यावर भीक मागणारी बालके, लोककलावंताची वस्ती, अस्थायी निवारा असणारी कुटुंबे, भटक्या जमाती, तेंदूपत्ता वेचणारी, विडया वळणारी इत्यादी ठिकाणी काम करणारे बालमजूर, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, शेतमळ्यांवरील आणि जंगलातील वास्तव्य असलेल्या पालकांची बालके, मागास वंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील वस्तीतील मुले यांची माहिती या शोध मोहिमेत घेण्यात येणार आहे.

विशेष करून 3 ते 6 वयोगटातील जी बालके एकात्मिक बाल विकास योजनेचा लाभ घेत नाहीत तसेच खाजगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सिनिअर केजी मध्ये जात नाहीत व 6 ते 18 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य बालके यांची शोध मोहीम घेण्यात येणार आहे.

आपल्या परिसरातील अशा शाळाबाह्य बालकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील 02141-227452 व 8275152363 या संपर्क क्रमांकांवर द्यावी किंवा नजीकच्या तहसील कार्यालयास / पोलीस ठाण्यास कळवावी तसेच नागरिकांनी या शोध मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व शिक्षणाधिकारी ज्योती शिंदे-पवार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक