जिल्ह्यात “रायगड बाईकर्स फेस्टिव्हल 2022” चे यशस्वी आयोजन

  



अलिबाग,दि.03 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिक युवक युवतींना रस्ता सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गेली 6 वर्षे रायगड बाईकर्स फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे. यावर्षी दि.26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाईकर्स फेस्टिव्हलच्या उद्घाटनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वाहतूक शाखा-रायगड पोलीस तसेच रायगड बाईकर्स फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जनजागृती बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक श्री.अश्वनाथ खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात असून सुरक्षित प्रवासासंबंधी जनजागृती करण्यासाठी रायगड पोलीस महत्वपूर्ण कार्य करीत असल्याचे जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक श्री.अश्वनाथ खेडेकर यांनी रॅलीप्रसंगी सांगितले. 

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून रस्ता सुरक्षा विषयावर प्रबोधन करणारे पथनाट्य सादर करण्यात आले.  मान्यवरांच्या हस्ते सुरक्षा रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली.

डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी रायगड बाईकर्स फेस्टिव्हलच्या उद्घाटनाची औपचारिक करीत जमलेल्या बाईकर्सना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सहभागी महिला रायडर्सचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढविले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांच्याकडून मतदार नोंदणीसाठी तसेच भारतीय निवडणूक आयोगाद्वारे आयोजित निरनिराळ्या स्पर्धांबद्दल माहिती देऊन त्यात सहभागी होण्यासाठी सर्व बाईक रायडर्सना आवाहन करण्यात आले.

जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या पुढाकारातून 'अवयवदानाचे' महत्त्व पटवून देऊन नागरिकांनी अवयवदान या श्रेष्ठ दानासाठी पुढे येण्याचे आवाहनदेखील या प्रसंगी करण्यात आले.

 महोत्सवाबद्दल माहिती देताना रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागांना प्रसिद्धीच्या झोतात आणून तेथील पर्यटनाला उभारी देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असे रायगड बाईकर्स फेस्टिव्हलचे संस्थापक आणि मुख्य आयोजक श्री.प्रसाद चौलकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकार यांचे युवा पिढीकडे विशेष लक्ष असून त्यांचे उपक्रम युवा पिढीला दिशा देणारे आणि प्रेरणादायी आहेत.  जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करीत असताना सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटन आणि सामाजिक जनजागृती या महत्त्वाच्या विषयांवर आमची संपूर्ण टीम कार्य करीत असल्याचे देखील श्री.चौलकर यांनी सांगितले.

या वर्षीचा बाईकर्स फेस्टिव्हल कोविड नियमांमुळे मर्यादित स्वरूपाचा करण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर इत्यादी जिल्ह्यातून सुमारे 200 बाईकस्वार या महोत्सवात सहभागी होते. नील बीच कॅम्पिंग, नांदगाव (मुरुड) येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. टेंट स्टे पद्धतीने निवास व्यवस्था, विविध बाईक संबधी स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रम, घरगुती पध्दतीचे जेवण, फायर नाईट अशा प्रकारे महोत्सवाचे स्वरूप होते. सहभागी बाईक रायडर्सना प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात अनेकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. त्यामध्ये मुख्य समन्वयक श्री.शार्दूल भोईर यांच्यासह कौस्तुभ पाटील, धनंजय साकृडकर, महेंद्र पाटील, केतन भगत, अतुल मोरे, आशिष पडवळ, स्वप्नील चव्हाण, विरेश वाणी, ज्ञानेश्वर कोल्हे, राजेश शिंदे, अरविंद भोपी, समीर शेख, रोशन सिंग, हेमचंद्र पाटील, राहुल गंभीर, प्रवीण बोने आदींनी विशेष परिश्रम घेतले.  विविध बाईकिंग क्लब, सामाजिक संस्था, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने यंदाचा बाईकर्स फेस्टिव्हल यशस्वीपणे पार पडला.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक