श्रीवर्धन पर्यटन महोत्सव 2022; पर्यटन महोत्सवातून सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

  


अलिबाग,दि.24(जिमाका):- श्रीवर्धनला अतिशय सुंदर असा समुद्र किनारा लाभला असून हा समुद्र किनारा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक श्रीवर्धन बीचला भेट देत असतात. ही बाब लक्षात घेवून राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने या वर्षी श्रीवर्धन पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग, नवी मुंबई आणि श्रीवर्धन पर्यटन संस्था-श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीवर्धन पर्यटन महोत्सव – 2022 आयोजित करण्यात आला आहे. दि.26 व 27 मार्च 2022 रोजी श्रीवर्धन बीच येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, या पर्यटन महोत्सवात सर्व पर्यटक व नागरिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.

दि.26 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री पर्यटन तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे रायगड यांच्या हस्ते होणार असून, या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दि.26 मार्च रोजी वाळूशिल्प प्रदर्शन, कोकण खाद्य संस्कृती स्टॉल, गिधाड संवर्धन, सर्प मित्र ओळख आणि स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, "स्वर गंधर्व" मराठमोळया गीताची बहारदार मैफील व दि.27 मार्च रोजी मर्दानी खेळ, कोकणची खाद्य संस्कृती स्टॉल आणि श्री.अंशुमन विचारे दिग्दर्शीत केलेला "चाल तुरुतुरु" असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

हा महोत्सव दोन दिवसाचा असून या महोत्सवाच्या माध्यमातून कोकण खाद्य संस्कृती प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी त्याचबरोबर कोकणातील काही विशिष्ट वस्तूंचे विक्रीसाठी विविध स्टॉल अभारले जाणार आहेत.

पर्यटन महोत्सवामुळे स्थानिक नागरिकांना आपल्या खाद्य कला कौशल्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटनस्थळांची प्रसिध्दी व प्रसार करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.

श्रीवर्धन पर्यटन महोत्सवास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन कोकण विभागाचे पर्यटन उपसंचालक श्री.हनुमंत कृ. हेडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक