रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पांतर्गत संलग्न रस्ते व सागरी पूल विकास प्रक्रियेला वेग

  

अलिबाग,दि.03 (जिमाका):- राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व कोकणचे सुपुत्र कै.बॅ.ए.आर. अंतुले साहेबांनी कोकणच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंत सागरी महामार्ग विकसित करण्याचा संकल्प केला होता. तद्नंतर बहुप्रतिक्षीत असलेल्या या सागरी महामार्गाची उभारणी करण्याचा मनोदय राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या समर्थ नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या  महाविकास आघाडी सरकारने केला.  तसेच कोकण पर्यटन विकासासह सर्वांगिण विकासासाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या या सागरी महामार्ग प्रकल्पास विशेष महत्त्व दिले आहे. बहुप्रतिक्षीत सागरी महामार्ग कालबद्ध कालावधीत पूर्णत्वास यावा यासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयामध्ये गठीत केलेल्या प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिटमध्ये या प्रकल्पाच्या समावेशासाठी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांना आग्रहाची विनंती केली. या युनिटच्या बैठकांमध्ये या प्रकल्पाचा नियमित प्रगती आढावा घेवून प्रकल्पासाठी शासन स्तरावरील रितसर मान्यता मिळण्यास गती मिळत आहे.

शासनाने रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांस कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त केले आहे. महामंडळामार्फत या सागरी महामार्गातील पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील रेवस ते कारंजा जोडणाऱ्या खाडी पुलाचे बांधकाम करणे, डहाणू बोर्डी-रेवस-रेड्डी सातर्डे रस्ता सागरी महामार्ग क्र. 4 वरील कोलमांडला वेश्वी दरम्यान बाणकोट खाडीवरील उर्वरीत पुलाचे काम पूर्ण करणे, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी खाडीवरील पुलाचे काम करणे व प्रस्तावित आखणीमध्ये सागरी महामार्गाकरीता बाह्यवळण व रुंदीकरणासाठी आवश्यक जागेसाठी भूसंपादन करणे व भूसंपादनाची आवश्यकता नसलेल्या दोन प्रमुख ठिकाणांस जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित आखणीमधील उर्वरित सर्व पुलांचे काम पूर्ण करणे, उर्वरीत रस्ता, बाह्यवळण रस्ते व पुलांचे बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे.  शासनाने महामंडळास ही कामे टप्पानिहाय हाती घेवून पूर्ण करण्यास नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे रायगड पालकमंत्री कु. आदिती तटकरे व रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नास व पाठपुराव्यास यश प्राप्त झाले आहे.

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाची व्यापकता विचारात घेवून सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रायगड जिल्ह्यातील करंजा ते रेवस खाडी पूलाच्या कामाची 850 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे व नजिकच्या कालावधीमध्ये या खाडी पूलाचे बांधकाम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केलेल्या सततच्या पाठपुराव्याची फलश्रुती या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या सागरी महामार्गाच्या टप्प्या-टप्प्यात होणाऱ्या कार्यामुळे हा प्रकल्प उभारणी प्रक्रियेस वेग मिळाला असून कालबद्ध कालावधीत ही प्रकल्प पूर्णत्वास येईल, असा विश्वास रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.तटकरे यांनी व्यक्त केला.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक