स्वयंसिद्धा संस्थेने पथनाट्यातून रोह्यात केली शासनाच्या योजनांची जनजागृती



अलिबाग, दि.13(जिमाका):- रोहा तालुक्यातील यशवंतखार, विद्या निकेतन हायस्कूल, सानेगाव, न्यू इंग्लिश स्कूल शेणवई, रोहा बस स्थानक येथे महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग व स्वयंसिद्धा विकास संस्था यांच्याद्वारे रोहा तहसिलदार कविता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा नुकताच लोककलेच्या माध्यमातून जागर करण्यात आला. 

यशवंतखार येथे झालेल्या या पथनाट्य कार्यक्रमाच्या वेळी पांडुरंग महादेव ठाकूर- उपसभापती बाजार समिती, अजय वसंत दिवकर- ग्रामपंचायत सदस्य, धर्मा जाणू ठाकूर- माजी ग्रामपंचायत सदस्य, जगन्नाथ मुकुंद ठाकूर काशिनाथ खोत, काशिनाथ दिवकर- रेशन दुकानदार, योगेश ठाकूर, यमुना ठाकूर, जगन मांडलेकर, हरी मांडलेकर, बळीबाई धुमाल, काशी म्हात्रे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांची, राज्य शासनाने रायगड जिल्ह्यासाठी घेतलेल्या विविध विकासात्मक निर्णयांची, जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर राज्यातील ग्रामीण जनतेस शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील गड किल्ले संवर्धनासाठी 606 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा रेवस ते जेट्टी सागरी महामार्ग चौपदरी व दुपदरी सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी करिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना राबविण्यात येत आहे. पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याची योजना लागू केली. अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपलं शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून निधी मंजूर केला. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 ची यशस्वी अंमलबजावणी केली. 31 मार्च 2019 दरम्यान कर्ज घेतलेल्या व 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. शबरी आदिवासी घरकुल योजनेत दिव्यांग लाभार्थींना पाच टक्के आरक्षण व दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले.शासकीय आणि अनुदानित शाळांमधील 06 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टिदोष निवारण्यासाठी मोफत चष्मे वाटप कार्यक्रम राबवित आहे. आपले सरकार....मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू केला. त्याचबरोबर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून रायगड जिल्ह्यात उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे रुग्णालय सुरू होण्याविषयी, जिल्ह्यात माणगाव येथील स्वतंत्र 100 खाटांचे स्त्री रुग्णालय, वडखळ येथे ट्रॉमा केअर सेंटर,  किहीम येथे डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्र कर्नाळा व फणसाड अभयारण्याचा विकास, रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणारे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र, कातकरी उत्थान अभियान, माझी वसुंधरा यासारख्या अभियानांची आणि अशा अनेक शासकीय योजनांची, उपक्रमांची माहिती यावेळी पथनाट्यातून उपस्थितांना देण्यात आली.

या पथनाट्याचे नेतृत्व स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता काशिनाथ साळवी करीत असून या पथनाट्यात दहा कलाकार सहभागी झाले होते. या पथनाट्यातून रायगड जिल्ह्यातील 21 ठिकाणी "दोन वर्षे जनसेवेची... महाविकास आघाडीची" या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे सुचिता साळवी यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक