“न्याय सर्वांसाठी” या ब्रीदवाक्यासह जिल्हा विधी प्राधिकरण आहे आपल्यासाठी..!


अलिबाग, दि.02 (जिमाका):- न्यायसंस्थेतील जिल्हा विधी प्राधिकरण हा घटक प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे. या जिल्हा विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून कोणत्याही गरजू नागरिकाकडे पैसे नाहीत म्हणून तो नागरिक न्यायापासून वंचित राहू नये, त्याला न्यायप्रक्रिया करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने शासकीय खर्चाद्वारे मोफत वकील उपलब्ध करून दिला जातो.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पीडित महिला व 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मोफत विधी सहाय्य उपलब्ध होते. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व जमातीचे सदस्य ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा अधिक नाही अशा व्यक्तींना हे सहाय्य मिळते. त्याचप्रमाणे औद्योगिक कामगार तुरुंगातील व्यक्ती, विपत्ती, वांशिक हिंसाचार, जातीय हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ आदी आपत्तींना बळी पडलेल्या व्यक्ती, विकलांग व्यक्ती आदींना मोफत विधी सहाय्य मिळू शकते.

या सहाय्यांतर्गत विनामूल्य कायदेशीर सल्ला, कायदेशीर प्रक्रियेत वकिलाद्वारे प्रतिनिधीत्व, खटल्यासाठी मसूदा तयार करणे व त्याकरिता येणारा खर्च मिळणे, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात अपील किंवा जामीन अर्ज करण्यास पेपरबुक आणि दस्तावेजाच्या अनुदानाचा खर्च, कायदेशीर कार्यवाहीमध्ये निर्णय, आदेश आणि इतर कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळण्यासाठी मदत करण्यात येते.

संबंधित गरजू व्यक्तीस मोफत विधी सहाय्य करताना काही खर्चही दिला जातो. त्यात योग्य त्या प्रकरणांमध्ये कोर्ट फीची रक्कम, टायपिंग, झेरॉक्स व इतर दस्तऐवज तयार करण्याचा खर्च, साक्षीदारांना समन्स पाठविण्याचा व न्यायालयीन वादाच्या अनुषंगाने होणारा इतर खर्च दिला जातो.

अशा प्रकारची सर्व मदत जिल्हा व तालुका न्यायालय, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आवारात, पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज केल्यास, पोर्टलवर नोंद केल्यास, नालसा (नॅशनल लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी) हेल्पलाईन- 15100/1800222324 येथे संपर्क केल्यास संबंधितास मिळू शकते.

या सेवेंतर्गत रायगड जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षभरात रायगड जिल्हा विधी प्राधिकरणाकडून एकूण 223 जणांना मोफत वकील पुरविण्यात आले आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्या.संदीप स्वामी यांनी दिली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक