मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा निवडणूक कार्यालयद्वारा आयोजित “स्त्रिया आणि लोकशाही” परिसंवाद कार्यक्रम संपन्न

पुरुषप्रधान समाजामध्ये महिलांच्या समस्यांवर उत्तर शोधण्याचे काम पुरुषांचे सुद्धा

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे



 

अलिबाग,दि.08 (जिमाका):- ज्या समाजामध्ये स्त्रिया आहेत, त्या समाजाचे घटक पुरुष आहेत. या पुरुषप्रधान समाजामध्ये महिलांच्या समस्यांवर उत्तर शोधण्याचे काम पुरुषांचे सुद्धा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे केले.

जागतिक महिला दिनानिमित्त आज (दि.08 मार्च) रोजी मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा निवडणूक कार्यालय, जे.एस.एम महाविद्यालयाद्वारा अलिबाग येथील पी.एन.पी नाट्यगृह येथे स्त्रिया आणि लोकशाही – लोकशाही गप्पा (भाग 5) या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले की, मी आजच्या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मी सर्वांना हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे. डॉ.दीपक पवार यांनी सांगितले की, हा कार्यक्रम जरी महिला दिनाचा तरी तो केवळ महिलांसाठी नाही आहे तर हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळेच सर्वांना हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला. स्त्रियांच्या समस्या कुठे सुरू होतात, तर त्या जन्म घेण्याच्या आगोदरच सुरू होतात. स्त्रीभ्रूणहत्येपासून त्यांच्या ज्या समस्या सुरू होतात त्यानंतर कुटुंबातील त्यांना देण्यात येणारी वेगळी वागणूक, विविध क्षेत्रात काम करीत असताना स्त्रियांना येणाऱ्या समस्या यांचा मागोवा यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला.

लोकशाही मूल्याचे भारतीय स्त्रीच्या आयुष्यातील स्थान, पारंपरिक कौटुंबिक संस्कार आणि संविधानिक मूल्ये यातील फरक, लोकशाही मूल्ये मुला-मुलींमध्ये लहानपणापासून रुजविणे शक्य आहे का, समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराचा मुला-मुलींच्या लोकशाही मूल्यदृष्टीवर होणारा परिणाम यासारख्या विविध प्रश्नांचा मागोवा या परिसंवादात घेतला जाणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

महिला दिनाचा कार्यक्रम म्हणजे महिलांनी महिलांसाठी केलेला कार्यक्रम असे काहीसे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र स्त्रियांच्या समस्या या केवळ त्याच्या समस्या नसून त्या संपूर्ण समाजाच्या समस्या आहेत, या जाणिवेतून या परिसंवादात स्त्री-पुरुष यांनी एकत्रित सांगोपांग चर्चा करावी, या दृष्टीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी, वैशाली पाटील, मुमताज शेख, शशिकांत सोनावणे, तसेच प्रयोगशील शिक्षक सुजाता पाटील, पत्रकार जयंत धुळप, प्रा.श्याम पाखरे, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी झाले होते. तर मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ.दीपक पवार हे या परिसंवादाचे संवादक होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते तृतीयपंथियांचा विशेष सन्मान करण्यात आला. जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग आणि रायगड जिल्हा निवडणूक कार्यालय हे या परिसंवादाचे सहआयोजक होते. विद्यार्थ्यांमध्ये लिंगभाव समतेची जाणीव-जागृती होण्याच्या दृष्टीने परिसंवादात चर्चा करण्यात आली. या परिसवांदाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरून आणि समाजमाध्यमांवरून थेट प्रक्षेपणही करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वत: मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.दीपक पवार यांनी केले.

या कार्यक्रमास विविध विभागांचे शासकीय अधिकारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक