पोषण महिना अभियान लोकसहभागात रायगड जिल्हा प्रथम

  


अलिबाग,दि.08 (जिमाका):- देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारतर्फे  सप्टेंबर 2021 मध्ये पोषण महिना अभियान राबविण्यात आला होता. रायगड जिल्ह्याने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावली, तसेच या अभियानाला उत्तम लोकसहभाग मिळाल्याने राज्यात लोकसहभागामध्ये रायगड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकाविले असून या कामगिरीबद्दल मंगळवार (दि.08 मार्च रोजी) महिला दिनानिमित्त राज्य शासनातर्फे मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रायगड जिल्हा प्रशासनास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला व बालविकास विभाग प्रधान‌ सचिव आय.ए. कुंदन, आयुक्त रुबल आग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

रायगड जिल्ह्यातर्फे जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हाधिकारी तथा पोषण अभियान अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी पुरस्कार स्वीकारला.

माता आणि बालके सदृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पोषण महिना अभियान दि.01 सप्टेंबर ते दि.30 सप्टेंबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. अभियानात महिनाभरात जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्य पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन कालावधी दरम्यान हात स्वच्छ धुण्याचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच माह कालावधीत गावांमध्ये प्रभातफेरी काढून आरोग्य व पोषण विषयक संदेशाचा प्रचार व प्रसार करण्यात आला. त्याचप्रमाणे अनेमिया मुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त केलेल्या शाळांच्या नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने पोषण माहमध्ये नियमितरीत्या शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजन दरम्यान लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व सेवन होईल असे नियोजन करण्यात आले होते.

प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण माह कालावधी दरम्यान एक टी-3 कॅम्पचे आयोजन करून विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली. तसेच पोषण माहमध्ये एएनएम आणि आशा स्वयसेविका यांनी गृहभेटी देऊन जनजागृती केली. पोषण माह कालावधीमध्ये अंगणवाडी स्तरावर एक समुदाय आधारित कार्यक्रम, ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण दिवस व बालक संगोपन आधारित पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या समन्वयाने पोषण माह कालावधीमध्ये सॅम बालकांच्या व्यवस्थापणासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्राचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमात लोकसहभाग घेण्यात आला.

पोषण महिनांतर्गत जिल्ह्यातील 17 प्रकल्पांमध्ये 27 लाख 44 हजार 876 उपक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाल्याने राज्यात लोकसहभागातून रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला होता. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे पोषण अभियानाचे अध्यक्ष असून हा पोषण महा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, कृषी पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्रांताधिकारी, तहसिलदार, जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच, कर्मचारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मेहनत घेतली.

पोषण महिना अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. महिन्याभरात जिल्ह्यात 27 लाख 44 हजार 876 उपक्रम राबविण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत या उपक्रमासाठी लोकसहभाग लाभल्याने, लोकसहभागात रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे, या शब्दात रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक