रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या मुंबई प्रादेशिक कार्यालयातर्फे रायगड येथे टाऊन हॉल मीटिंग संपन्न


अलिबाग, दि.15 (जिमाका):- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), मुंबई प्रादेशिक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील MSME उद्योजकांसाठी सोमवार, दि.14 मार्च 2022 रोजी एक टाऊन हॉल मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यात प्रामुख्याने गणपती मूर्ती बनविणे आणि पापड बनविणे ही कामे करणारे उद्योजक सहभागी झाले होते. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील एमएसएमई उद्योजकांना बँकिंग वाहिनीच्या कक्षेत आणणे आणि गणपती मूर्ती तसेच पापड बनविणाऱ्या कारागिरांना आर्थिक जोड देण्याबाबत जागरुकता निर्माण करणे, हा टाऊनहॉल सभेचा मुख्य हेतू होता.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी FIDD, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या महाव्यवस्थापक श्रीमती कल्पना मोरे या होत्या तर बँक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर श्रीमती शम्पा बिस्वास, बँक ऑफ बडोदाचे उप.झोनल मॅनेजर श्री.हेमंत कृ.लाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या, आरएसईटीआय चे संचालक श्री.आनंद राठोड आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.विजय कृ.कुलकर्णी,उमेद अभियाचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ हे या बैठकीला उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली आणि त्यानंतर श्रीमती कल्पना मोरे यांनी उद्घाटनपर भाषण केले. त्या म्हणाल्या की, जिल्ह्यातील एमएसएमईकडे अर्थव्यवस्थेतील योगदान तसेच रोजगार निर्मिती या दोन्ही बाबतीत असलेली क्षमता सरकार आणि रिझर्व्ह बँक ओळखते. त्यांनी बैठकीत उपस्थित बँक अधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान एकदा बचतगट महिलांना प्राधान्याने बँकिंग सेवा पुरविण्याच्या शक्यता शोधण्याचा सल्ला दिला. बँका आणि उद्योजकांमधील संवादाच्या अंतरावर जोर देऊन त्यांनी पुढे सांगितले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि एमएसएमईला हाताळण्यासाठी वचनबद्ध आहे आणि टाऊनहॉल मीटिंगचा उद्देश त्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा आहे.

बँकर्स आणि जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांसह 180 हून अधिक उद्योजक बैठकीत सहभागी झाले. तसेच, या बैठकीदरम्यान एक संवादात्मक सत्र आयोजित करण्यात आले ज्यामध्ये एमएसएमई उद्योजकांनी विविध प्रश्न उपस्थित केले, या प्रश्नांना विविध बँक अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती उमेद अभियानांतर्गत बचतगटांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

उद्योजकांशी पतसंबंध वाढविण्याच्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या सामूहिक संकल्पाने बैठकीची सांगता झाली.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक