शासकीय अर्थसहाय्याचा लाभ घेण्याकरीता पात्र कलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तर कला संस्थांनी सांस्कृतिक संचालनालयाकडे तात्काळ अर्ज करावेत -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

अलिबाग,दि.24(जिमाका):- प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकार / संस्था यांना कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे अर्थसहाय्य एकरकमी एकदाच पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. प्रति लाभार्थी (एकल कलाकार) रु.5 हजार आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

यास्तव प्रयोगात्मक क्षेत्रातील एकल कलावंत यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संबंधित तालुक्याचे तहसिलदार किंवा गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड यांच्याकडे तर समूह / फड / पथक यांनी त्यांच्या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, एम.जी.रोड, मुंबई- 400032/ सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, पहिला मजला, विमानतळ मार्ग, येरवडा, पुणे 411006 यांच्याकडे दि.23 मार्च ते 28 मार्च 2022 या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.गजानन लेंडी यांनी केले आहे.

संबंधित योजनेच्या दोन्ही अर्जांचे नमुने, या योजनेकरीता पात्रता, निकष, अटी व त्यासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी प्रत्येक तालुक्याची पंचायत समिती कार्यालये आणि तहसिलदार कार्यालये तसेच समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, रायगड या कार्यालयात उपलब्ध राहतील. तसेच हे अर्ज व माहिती रायगड जिल्ह्याच्या https://raigad.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.

तरी पात्र कलावंत व संस्था यांनी शासकीय अर्थसहाय्याचा लाभ घेण्याकरीता वर नमूद केल्याप्रमाणे संबंधित कार्यालयास दि.23 मार्च ते 28 मार्च 2022 या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.गजानन लेंडी यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रता व निकष पुढीलप्रमाणे: महाराष्ट्र राज्यात प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर उपजीविका असणारे आर्थिकदृष्टया दुर्बल कलाकार यासाठी पात्र राहतील. महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत, वार्षिक उत्पन्न 48 हजार रुपयांच्या कमाल मर्यादित असणे आवश्यक आहे (तहसिलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र) तर केंद्र शासन व राज्य शासनाच्या जेष्ठ कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना, इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक