प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या 6 व्या टप्प्यांतर्गत माहे एप्रिल ते सप्टेंबर 2022 या सहा महिन्यांसाठी मुदतवाढ

पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन 

अलिबाग, दि.01 (जिमाका):- कोविड-19 च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शासनाने माहे एप्रिल 2020 पासून महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु केली. रायगड जिल्ह्यातील माहे एप्रिल 2020 पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र लाभार्थींना दरमहा प्रति व्यक्ती 05 किलो अन्नधान्य (प्रति व्यक्ती 02 किलो गहू व 03 किलो तांदूळ) मोफत वितरीत करण्यास प्रारंभ झाला आहे.  या पार्श्वभूमीवर जिल्हयातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी दरमहा आपल्या शिधापत्रिकेवरील व्यक्तींना देय असलेल्या परिमाणानुसार दरमहा मोफत अन्नधान्याची उचल आपल्या गावातील व गावाशेजारील रास्तभाव दुकानातून करावी व काही अडचणी असल्यास संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

आतापर्यंत शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या 05 टप्प्यांची अंमलबजावणी यशस्वीपणे केली असून माहे एप्रिल ते माहे सप्टेंबर-2022 पर्यंत पुढील 6 महिन्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा सहावा टप्पा शासनाने मंजूर केला आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत यापूर्वीच्या 05 टप्प्यातील व आताच्या 06 टप्प्याची माहिती पुढीलप्रमाणे:-

योजनेचा पहिला टप्पा- कालावधी, एप्रिल 2020 ते जून 2020, परिमाण प्रति व्यक्ती (मोफत अन्नधान्य किलोमध्ये) 05 किलो, एकूण लाभार्थी प्रति माह 15 लाख 69 हजार 333, एकूण वितरण 23 हजार 540 मे.टन.

योजनेचा दुसरा टप्पा- कालावधी, जुलै 2020 ते नोव्हेंबर 2020, परिमाण प्रतिव्यक्ती (मोफत अन्नधान्य किलोमध्ये) 05 किलो, एकूण लाभार्थी प्रतिमाह 16 लाख 54 हजार 200, एकूण वितरण 41 हजार 355 मे.टन.

योजनेचा तिसरा टप्पा- कालावधी, मे 2021 ते जून 2021, परिमाण प्रतिव्यक्ती (मोफत अन्नधान्य किलोमध्ये) 05 किलो, एकूण लाभार्थी प्रतिमाह 16 लाख 01 हजार 200, एकूण वितरण 16 हजार 12 मे.टन.

योजनेचा चौथा टप्पा- कालावधी, जुलै 2021 ते नोव्हेंबर 2021, परिमाण प्रतिव्यक्ती (मोफत अन्नधान्य किलोमध्ये) 05 किलो, एकूण लाभार्थी प्रतिमाह 16 लाख 71 हजार 320, एकूण वितरण 41 हजार 783 मे.टन.

योजनेचा पाचवा टप्पा- कालावधी, डिसेंबर 2021 ते मार्च 2022, परिमाण प्रतिव्यक्ती (मोफत अन्नधान्य किलोमध्ये) 05 किलो, एकूण लाभार्थी प्रतिमाह 16 लाख 71 हजार 538, एकूण वितरण 33 हजार 430 मे.टन.

योजनेचा सहावा टप्पा- कालावधी, एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022, (प्रस्तावित).

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या वरील 05 टप्यात दरमहा सरासरी 16 लाख 33 हजार 518 लाभार्थींना एकूण 1 लाख 56 हजार 120 मे. टन अन्नधान्य ई-पॉज मशिन्सवर आधार अॅथॉन्टीफिकेशन करुन तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांचे आधार सिडींग झाले नसतील किंवा अंगठा येत नसेल त्या पात्र लाभार्थ्यांना तात्पुरते ऑफलाईन पध्दतीने अन्रधान्य वितरण करण्यात आले.

जिल्हयातील डोंगराळ भागात राहणारे कातकरी व इतर गोरगरीब, आदिवासी कुटूंबांना दरमहा नियमितपणे शासन परिपत्रकानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत (NFSA) नियमित व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (PMGKAY) मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना कोणताही पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येते.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 06 व्या टप्प्यात प्रति व्यक्ती 05 किलो मोफत अन्नधान्य शासनाने मंजूर केले असून माहे एप्रिल ते माहे सप्टेंबर, 2022 या पुढील 06 महिन्यांकरीता ही योजना राबविण्यात येत आहे.

तरी जिल्हयातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी दरमहा आपल्या शिधापत्रिकेवरील व्यक्तींना देय असलेल्या परिमाणानुसार दरमहा मोफत अन्नधान्याची उचल आपल्या गावातील व गावाशेजारील रास्तभाव दुकानातून करावी व काही अडचणी असल्यास संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक