जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले “गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र” होत आहे विद्यार्थीप्रिय

 जिल्ह्यातील 4 हजार 370 विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केले गरुडझेप अॅप


 

अलिबाग, दि.01 (जिमाका):- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत दि.04 डिसेंबर 2021 रोजी गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र साकारण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून महिन्यातील दर शनिवार व रविवारी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळते. आतापर्यंत जिल्ह्यातील 6 हजार 549 विद्यार्थ्यांनी या गरुडझेप स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रात नोंदणी केली आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. परंतू काही विद्यार्थ्यांना संबंधित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रावर पोहोचणे शक्य होत नसल्याने अशा विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये व स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गरुडझेप अॅपची निर्मिती करण्यात आली. हे ॲप अत्यंत कमी कालावधीत विद्यार्थीप्रिय झाले असून आतापर्यंत जिल्ह्यातील 4 हजार 270 विद्यार्थ्यांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.

गरुडझेप स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रात नोंदणी केलेले तालुकानिहाय विद्यार्थी संख्या:-

उरण- 337, पनवेल- 1 हजार 732, खालापूर-466, कर्जत-493, पेण-320, अलिबाग-570, मुरूड-250, रोहा-251, सुधागड-112, माणगाव-668, तळा-159, श्रीवर्धन-270, म्हसळा-135, महाड-680, पोलादपूर- 106

या मार्गदर्शन केंद्रामध्ये जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण येथील भाऊसाहेब नेने कॉलेज हॉल येथे हे केंद्र सुरु झाले. कोविड-19 मधील प्रतिबंधक उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांना पेण येथील या केंद्रावर हजर राहणे शक्य नव्हते, म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी ते राहत असणाऱ्या तालुक्यातील तहसीलमध्ये दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली. त्याचाही प्रत्येक शनिवार व रविवार असे दोन दिवस सकाळ व दुपार अशा दोन अभ्यास सत्रांचा लाभ हे विद्यार्थी घेत आहेत.

या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे होणाऱ्या विनामूल्य मार्गदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक