कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी चंद्रकांत डांगे रुजू

वर्षभरात महावितरणच्या एकूण महसूलात 50 टक्क्यांपर्यंत योगदान वाढविण्याचा संकल्प

 


अलिबाग,दि.20 (जिमाका):- महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी श्री.चंद्रकांत डांगे (भा.प्र.से) नुकतेच रुजू झाले आहेत. ते 2010 च्या केडरचे भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. महावितरणच्या एकूण महसूलात कोकण प्रादेशिक विभागाचे सध्या असलेले 43 ते 45 टक्के योगदान येत्या वर्षभरात 50 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. 

श्री.डांगे यांनी आयआयटी खरगपूर येथून औद्योगिक अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून 1994 मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. नागपूरचे अप्पर जिल्हाधिकारी, जळगाव महानगरपालिका आयुक्त, मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात सहसचिव, ठाण्याच्या आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक आदी पदांवर त्यांनी आपल्या लोकाभिमुख कामाचा ठसा उमटविला असून प्रशासकीय सेवेतील 28 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मीरा-भाईंदर महानगरपालिकेत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यात स्थलांतरित मजूरांच्या निवास-भोजनापासून रुग्णांच्या उपचारासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांचा समावेश आहे. 

सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री.डांगे यांनी कोकण प्रादेशिक विभागातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याबाबत आश्वासित करताना महसूल वाढीला प्राधान्य देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी प्रादेशिक विभागातील भांडूप, कल्याण, रत्नागिरी, नाशिक, जळगाव या परिमंडलांमध्ये वीजचोरीला प्रभावी प्रतिबंध, वीज ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीवर भर राहणार असल्याचे स्पष्ट करतानाच त्यांनी महावितरणच्या एकूण महसूलात कोकण प्रादेशिक विभागाचा वाटा 50 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.



00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक