स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यात आरोग्य मेळाव्यांचे आयोजन

आरोग्य मेळाव्यांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग,दि.18 (जिमाका):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात दि.18 ते 22 एप्रिल 2022 प्रत्येक आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य मेळाव्यांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आरोग्य मेळाव्याकरिता प्रत्येक तालुकास्तरावर पंचायत समिती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. यामध्ये गटविकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, तालुका शिक्षणाधिकारी, तालुका समाजकल्याण अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य आहेत. या मेळाव्याचा शुभारंभ स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या आरोग्य मेळाव्यांमध्ये स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, अस्थिरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा तज्ञ, दंतशल्यचिकित्सक, भिषक अशा विविध वैद्यकीय तज्ञांमार्फत मोफत वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. तसेच आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत नागरिकांना युनिक हेल्थ आयडी तयार करून दिले जाणार आहेत. पात्र नागरिकांसाठी आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्मान भारत कार्ड मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे. विविध संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांना आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे.

तसेच या आरोग्य मेळाव्यांमध्ये रक्तदान शिबिरे, अवयवदान नोंदणी व एचएलएल लॅबमार्फत मोफत रक्ततपासण्या करण्यात येणार आहेत. रुग्णांना आवश्यकता भासल्यास टेलिकन्स्ल्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आरोग्य मेळाव्यांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या तालुक्यातील नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे नोंदणीसाठी संपर्क साधावयाचा आहे.

आरोग्य मेळाव्यांसाठी जिल्ह्यातील शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, नागरी संस्था यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. तरी या आरोग्य मेळाव्यांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी केले आहे.

आरोग्य मेळाव्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

दि.18 एप्रिल 2022, वेळ: सकाळी 09 ते दुपारी 04.00, स्थळ: उपजिल्हा रुग्णालय-पनवेल, ग्रामीण रुग्णालय-चौक, ग्रामीण रुग्णालय-महाड, ग्रामीण रुग्णालय-पोलादपूर, प्राथमिक आरोग्य केंद्र-तळा

दि.19 एप्रिल 2022, वेळ: सकाळी 09 ते दुपारी 04.00, स्थळ: उपजिल्हा रुग्णालय-पेण, उपजिल्हा रुग्णालय-कर्जत, प्राथमिक आरोग्य केंद्र-पाली, उपजिल्हा रुग्णालय-माणगाव.

दि.20 एप्रिल 2022, वेळ: सकाळी 09 ते दुपारी 04.00, स्थळ: उपजिल्हा रुग्णालय-रोहा, उपजिल्हा रुग्णालय-श्रीवर्धन.

दि.21 एप्रिल 2022, वेळ: सकाळी 09 ते दुपारी 04.00, स्थळ: जिल्हा रुग्णालय-अलिबाग.

दि.22 एप्रिल 2022, वेळ: सकाळी 09 ते दुपारी 04.00, स्थळ: डीसीएचसी बोकडविरा-उरण, ग्रामीण रुग्णालय-म्हसळा, ग्रामीण रुग्णालय-मुरुड.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक