सर्वसामान्य जनतेचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी शासन प्रयत्नशील - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

 पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सर्वरोग निदान आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन संपन्न

 


अलिबाग,दि.21 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. म्हणूनच केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या माध्यमातून भव्य आरोग्य मेळावा, मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अलिबाग येथे सर्व रोग निदान आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित "सर्वरोग निदान आरोग्य मेळावा" चे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग-रायगड येथे संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय एस.एम.सोनुने,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक रायगड डॉ.प्रमोद गवई, उपविभागीय अधिकारी श्री.प्रशांत ढगे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ.गजानन गुंजकर, प्रशासकीय अधिकारी वर्ग 1, वैद्यकीय महाविद्यालय श्री.सुनील चव्हाण, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय श्री.पी.डी.धामोडा तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागांचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, अधिपरिचारिका, अधिकारी व कर्मचारी व सर्व रोग निदान शिबिराकरिता आलेले रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा सामान्य रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अलिबाग यांच्यामार्फत आयोजित केलेला आरोग्य मेळावा स्तुत्य असून रुग्ण सेवेच्या दृष्टीने उपयोगी असल्याचे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले. अनेक नवीन उपक्रम राबवित असताना, खऱ्या अर्थाने शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचा प्रसार करणे गरजेचे आहे. अनेक वेळा नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा शासकीय रुग्णालयात मिळतात याची माहिती नसल्याने ते खासगी रुग्णालयात जात असतात. त्यांना त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार कोणत्या प्रकारचे लाभ मिळू शकतील यांची माहितीसुद्धा नसते. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेत अनेक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. या योजनेंतर्गत खासगी रुग्णालयात दोन टक्के खाटा उपलब्ध आहेत, आता ती संख्या चार टक्के इतकी नेण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना त्याचाही लाभ मिळणे आवश्यक आहे.

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या केंद्रांतर्गत रक्त तपासणी सुविधा उपलब्ध आहे. मात्र बहुतांश नागरिकांना याविषयीची माहीत नसल्याने ते एकतर खासगी रुग्णालयात जातात नाहीतर जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन उपचारासाठी आवश्यक असलेल्या चाचण्या करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त तपासणी होत आहे याचा प्रसार होण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सूचित केले.

रायगड जिल्ह्यात होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम होणार आहे. भविष्यात सर्व आजारांवर रायगड जिल्ह्यातच उपचार होतील. तसेच तज्ञ वैद्यकीय अधिकारी सुद्धा उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी पालकमंत्री कु.तटकरे यांनी व्यक्त करून त्यांनी कोरोना काळात आरोग्य यंत्रणेसह इतर विभागानेसुद्धा उल्लेखनीय कार्य केले आहे. कोरोना काळात नर्सिंग स्कूलची इमारत ही रुग्णांसाठी देण्यात आली. त्या इमारतीचा लाभ वैद्यकीय महाविद्यालयासाठी झाला आहे. या सर्वांच्या प्रयत्नातून रायगड जिल्हा हा कोरोनामुक्त झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालय उभारणीकरिता व कोविड महामारीच्या कालावधीमध्ये परिचारिका महाविदयालयाची इमारत अत्यावश्यक सेवेकरिता उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि या कालावधीमध्ये रुग्ण सेवेसाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने तसेच आरोग्य विभागाच्या सर्व सहकाऱ्यांबद्दल गौरवोद्गार काढले.

या उपक्रमाच्या निमित्ताने प्राथमिक स्वरूपात पालकमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे 80 लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. तसेच त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये उभारलेल्या शिबिरातील विविध स्टॉल्सना, जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या माहितीपर स्टॉलला व एच.आय.व्ही. एड्स जनजागृती प्रदर्शनालाही भेट दिली.

यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या उल्लेखनीय कामकाजाची माहिती देणाऱ्या चाकोरीच्या पलीकडेया पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.आदिती तटकरे व उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दि.18 ते 22 एप्रिल 2022 दरम्यान आरोग्य मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, कान, नाक, घसा, दंत चिकित्सा, भिषक, रक्त तपासणी, रक्तदान, अवयवदान, टेली-कन्सल्टेशन व आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड याबाबत रुग्णांनी लाभ घ्यावा, याकरिता या शिबिराचे आयोजन केले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी प्रास्ताविकात सांगितले. 

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.तिवारी (सर्जन), डॉ.विश्वेकर (अस्थिरोग तज्ञ), डॉ.निशिगंधा म्हात्रे (त्वचारोग तज्ञ), डॉ.सौरभ पाटील (रेडिओलॉजिस्ट), जिल्हा रुग्णालयातील सर्व तज्ञ, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वृंद, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व, सामुदायी आरोग्य अधिकारी तसेच आरबीएसके कार्यक्रमाचे सर्व वैद्यकीय अधिकारी व एनएचएम विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले.

या शिबिराचा एकूण 506 रुग्णांनी लाभ घेतला असून यामध्ये 80 नागरिकांना आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड वितरित करण्यात आले. मरणोत्तर नेत्रदान करण्याकरिता 07 जणांनी संमतीपत्र दिले. तसेच या शिबिरामध्ये सर्जरीकरिता 7 रुग्णांचे निदान झालेले असून लवकरच अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्यांची सर्जरी होणार आहे. तसेच मोतीबिंदू सर्जरीकरिता 12 लोकांचे निदान झालेले असून त्यांचीही सर्जरी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिकलसेल समन्वयक श्री.प्रतिम सुतार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई यांनी केले. 

00000

Comments

  1. Shaheb Roha Raigadh Madhe Sarkari Davakhana madhe Lediz Speslit LediDr Nahi Aahe Aani Dhant Dr pan Nahi Aahe Kura karun ya Dr Ranchi Lavkarat Lavkar Bharti karavi he Vinanti Aahe 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक