मुरुड तालुक्यातील नांदगाव-दांडा येथे पर्यटन उद्योजकीय कार्यशाळा संपन्न


अलिबाग,दि.22 (जिमाका):- नांदगाव बीच परिसरात कार्यरत असलेले हॉटेल व्यवसायिक, होम स्टे, कृषी पर्यटन धारक आणि रिसॉर्ट व्यवसायिक यांच्यासाठी पर्यटनावर आधारित कार्यशाळा नांदगाव बीच संस्था आणि पर्यटन संचालनालय (DoT)कोकण विभाग नवी मुंबई  यांनी संयुक्त विद्यमाने  कंदील रिसॉर्ट, मौजे.नांदगाव-दांडा येथे दि.21 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. या पर्यटन कार्यशाळेत जवळपास 38 हॉटेल व्यवसायिक, होम स्टे धारक, रिसॉर्ट व्यवसायिक आणि कृषी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी श्री.हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) कोकण विभाग नवी मुंबई, निसर्ग पर्यटनचे संचालक श्री.संजय नाईक, बिजनेस कोच व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ.संतोष कामेरकर, नांदगाव बीच संस्थेचे अध्यक्ष श्री.महेश मापगवकर, नांदगाव बीच संस्थेचे उपाध्यक्ष श्री.स्वप्नील चव्हाण, सचिव श्री.तुषार दिवेकर आणि अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे श्री.निमेश परब, इंडोलॉजी प्रशिक्षक श्रीमती संगीता कळसकर आणि निसर्ग पर्यटनच्या संचालिका सौ.श्वेता नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेत पर्यटन कोकण विभाग, नवी मुंबईचे उपसंचालक श्री.हनुमंत हेडे यांनी एमटीडीसी आणि पर्यटन संचालनालयाचे कार्य तसेच शासनाने जाहीर केलेल्या योजना उदा.कृषी पर्यटन योजना, पर्यटनास औद्योगिक दर्जा, adventure tourism policy, पर्यटन धोरण 2016 ची सविस्तर माहिती दिली. श्री.हनुमंत हेडे यांनी पर्यटन मध्ये आदरतिथ्यचे महत्व, हॉटेल मधील रूम्सची स्वच्छता, किचन स्वच्छता आणि अनुभवजण्य पर्यटन यावरही मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले.

डॉ.संतोष कामेरकर यांनी उद्योजकीय मानसिकतेबद्दल उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे उद्योजकांनी शिकत राहणे खूप गरजेचे आहे. शिकल्यामुळे आपल्याला आणखीन नवीन नवीन गोष्टी अंमलात आणता येतात त्याचबरोबर इतरांच्या व्यवसायामध्ये आपण जाऊन डोकावून बघितलं तर तो कोणत्या प्रकारे नवीन उपक्रम, संकल्पना राबवतोय, त्याबद्दल माहिती मिळते अशी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. उद्योजकांनी कायम शिकत राहिले तर फायदा मिळतो हे वारंवार श्री.कामेरकर यांनी सांगितले तसेच ते म्हणाले की, माहित नाही, हे देखील माहित नाही अशा अनेक गोष्टी जगामध्ये आहेत ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही, त्याचबरोबर लोकांनी एकमेकांना मदत केली पाहिजे, सहकार्य केले पाहिजे असेही सांगितले.

श्री.संजय नाईक मार्गदर्शन करताना म्हणाले की, पर्यटक आकर्षित करण्यासाठी सहल आयोजकांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. रानमाणूस या नावाने यूट्यूब चॅनल वर खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली जाते. तसेच प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय वाढविण्यासाठी योग्य तो समन्वय साधून या व्यवसायात वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक आकर्षित करता येईल, याबद्दल खात्री दिली. उद्योजकांनी पुढाकार घ्यायला हवा. यापूर्वी अनेक प्रकारचे उपक्रम राबविले गेले आहेत,याचाही त्यांनी उल्लेख केला. या कार्यक्रमाचे नियोजन उत्तम केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदनही केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक