तहसिलदार मीनल दळवी यांचे स्पर्धा विश्व अकॅडमीतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

  


अलिबाग, दि.29 (जिमाका):- बहुतांश विद्यार्थ्यांना 10 वी, 12 वी, पदवी परीक्षेनंतर पुढे काय करायचे, कशात करियर करायचे या समस्येला सामोरे जावे लागते. या वयातील आणि अशा स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता गेली काही वर्षे स्वयंसिद्धा संचलित स्पर्धा विश्व अकॅडेमी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम राबवित असून त्यांना विविध स्पर्धा परीक्षेसंदर्भात माहिती देवून अशा उमेदवारांना मदत करीत आहेत. आजपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील जवळपास 850 पेक्षा अधिक उमेदवारांना अभ्यासरूपी मेहनतीने व संस्थेच्या मार्गदर्शनामुळे सरकारी नोकरी मिळविता आली आहे.

असे असले तरी आजही स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत जिल्ह्यातील बरेच विद्यार्थी अलिप्त किंवा वंचित राहताना दिसत आहेत. या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता अलिबागच्या तहसिलदार मीनल दळवी यांनी अलिबागस्थित स्पर्धा विश्व अकॅडेमीला सदिच्छा भेट दिली व उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, कोणत्या वयात तयारीला लागावे, परीक्षेचे बदलणारे स्वरूप, शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या संदर्भात उत्तम मार्गदर्शन केले व या विद्यार्थ्यांनी खूप प्रामाणिकपणे अभ्यास करावा, स्वतःच्या नोट्स्‍ स्वतः तयार कराव्यात, सखोल वाचन करून परीक्षेच्या गरजेनुसार अभ्यासावर भर द्यावा, त्याकरिता उत्तम संदर्भ व मागील प्रश्नपत्रिका पाहाव्यात, असे प्रतिपादन केले.

तसेच जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून गरूडझेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तथा अभ्यासिका उपलब्ध झाली असून त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही सांगितले.

शेवटी त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून योग्य दिशा देण्याचे कार्य म्हणजे उत्तम समाज घडविण्याचे कार्य स्वयंसिध्दा संस्था, स्पर्धा विश्व अकॅडेमीच्या सर्वेसर्वा तपस्वी नंदकुमार गोंधळी, शिक्षिका सुचिता काशिनाथ साळवी यांच्या माध्यमातून होत आहे, याबाबत सर्वांचे कौतुक केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक