आपत्तीच्या वेळी कायम सतर्क राहावे - तहसिलदार मिनल दळवी

 

अलिबाग, दि.22 (जिमाका):- जीवनात महापूर, ढग फुटी, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती केव्हाही येऊ शकतात, यासाठी कायम सतर्क राहून आपल्या गावातील नागरिकांना मदत करण्यासाठी आपण स्वतः सक्षम असले पाहिजे, त्यासाठी आपल्याला माहिती हवी व याचा लाभ इतरांना द्यायला हवा, असे प्रतिपादन अलिबाग तहसिलदार मिनल दळवी यांनी आज येथे केले.

अलिबाग तहसील कार्यालयाने जिल्हा नियोजन सभागृहात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी नायब तहसिलदार अजित टोळकर, रायगड भूषण व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, अलिबाग तालुक्यातील 150 मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटील उपस्थित होते.

या कार्यशाळेत आपत्ती सुरक्षा मित्र, योगशिक्षक सुहास गानू यांनी योगाचे महत्व व प्रात्यक्षिक दाखविले. यानंतर जयपाल पाटील यांनी उपस्थितांना विजेच्या वस्तू, गॅस सिलेंडर, गिझर यांच्यामुळे होणाऱ्या दूर्घटना, सर्पदंश, विचू दंश व त्यावरील उपाययोजना याबाबतची माहिती दिली.

रायगड वाहतूक पोलीस प्रशांत म्हात्रे यांनी महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन क्रमांक 112 तसेच रुग्णवाहिकेसाठी हेल्पलाईन क्रमांक 108 चा उपयोग याविषयीची माहिती दिली. यावेळी 108 चे डॉ.पांडे व पायलट श्री.म्हात्रे यांनी सी. पी.आर. (कार्डिओपल्मनरी रेस्यूसिटेशन) चे प्रात्यक्षिक करून दाखविले.

या कार्यशाळेच्या निमित्ताने श्री.जयपाल पाटील आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीबाबत करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे तहसिलदार मीनल दळवी यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.            

कार्यशाळेचे नियोजन अलिबाग तहसील कार्यालयातील श्री.शेरमकर व सुंखले यांनी उत्तमरित्या केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक