उरण नगरपरिषद माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयामध्ये गरुडझेप स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू

  


अलिबाग, दि.05 (जिमाका):- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जिल्ह्यातील विविध तालुक्यात सुरू करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून महिन्यातील दर शनिवार व रविवारी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उरण नगरपरिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालय येथे गरूडझेप स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राची स्थापना करण्यात आली. यासाठी तहसिलदार श्री.भाऊसाहेब अंधारे आणि मुख्याधिकारी श्री.संतोष माळी यांनी पुढाकार घेतला.

या अभ्यासिकेचे उद्घाटन तहसिलदार श्री.भाऊसाहेब अंधारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसिलदार श्री.अंधारे आणि मुख्याधिकारी श्री.माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या काळात मिळणाऱ्या सुविधा आम्हाला त्याकाळी उपलब्ध नव्हत्या. अथक परिश्रमाने, संघर्षाने प्रत्येक गोष्ट मिळवावी लागली. स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासासाठी लागणारी पुस्तकेही उपलब्ध होणे सोपे नव्हते. आज जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी ही सुवर्णसंधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, त्यातच सर्व विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य दडलेले आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात हे केंद्र सुरु करण्यात आले असून काही विद्यार्थ्यांना संबंधित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रावर पोहोचणे शक्य होत नसल्याने अशा विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये व स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गरुडझेप अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपवर ऑनलाईन लेक्चर्स उपलब्ध असून बहुतेक विषयाची आवश्यक ती पुस्तकेही उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. हे ॲप अत्यंत कमी कालावधीत विद्यार्थीप्रिय झाले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री.संतोष पवार यांनी केले. या कार्यक्रमाला उरण कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने तसेच श्री.प्रसाद मांडेलकर, तहसील कार्यालयाचे श्री.सुरवाडे, उरण नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक श्री.सुरेश तेजी, मुकादम श्री.महेंद्र साळवी, श्री.धनेश कासारे, ग्रंथालयाचे श्री.जयेश वत्सराज हे उपस्थित होते.

कार्यक्रमाअंती विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे आभार मानून ही अतिशय महत्वाची आणि नामी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक