“क्षयरोग मुक्त भारत” होण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय अन् आरोग्य विभागाने कसली कंबर

  


अलिबाग, दि.05 (जिमाका):- जागतिक क्षयरोग दिन दि.24 मार्च 2022 रोजी असतो. त्यानिमित्ताने जिल्ह्यात दि.24 मार्च ते दि.01 एप्रिल 2022 या कालावधीत क्षयरोग मुक्त भारत ही शपथ घेऊन विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले.

जिल्हा क्षयरोग कार्यालयात क्षयरोग उपचार पद्धतीचे जनक डॉ.राबर्ट कौच यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व कर्मचाऱ्यांनी क्षयरोग मुक्त भारत ही शपथ घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे क्षयरोगाचे पोस्टर प्रदर्शन आयोजित करून त्याबाबतची माहिती येथील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. ही पोस्टर्स ANM व GNM ला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी बनविली होती. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश ठोकळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घासे, जिल्हा पी.पी.एम.समन्वयक श्री.सतीश दंतराव, आरोग्य सहाय्यक श्री.उदय चव्हाण, फार्मसिस्ट श्री.दत्तात्रय शिंदे, डेटा एन्ट्री ऑपरेटर सौ.वृषाली पाटील, सौ.धनश्री कोळी, श्रीमती गीता गोरेगावकर, श्री.कृष्णा नाईक व राजू पालवनकर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

महाड तालुक्यात सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांना क्षयरोगाचे मार्गदर्शन करून, त्यांना क्षयरोग मुक्त भारत ही शपथ दिली. पोलादपूर येथील शाळेत विद्यार्थ्यांना क्षयरोगाचे मार्गदर्शन करून, त्यांना त्यावर आधारित निबंध लिहिण्यासाठी सांगितले, त्यानुसार निबंध स्पर्धा घेण्यात आली. या निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय अशा क्रमांकाने गौरविण्यात आले. कर्जत, पेण, पाली, रोहा, पनवेल, माणगाव, तळा, मुरुड, उरण, अलिबाग,श्रीवर्धन, म्हसळा व पनवेल महानगरपालिका येथे मोठ्या प्रमाणात क्षयरोगावर मार्गदर्शन करून क्षयरोग मुक्त भारत व जिल्हा करण्याची शपथ घेण्यात आली.

या उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश ठोकळ यांनी जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाने व वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कंबर कसली असून यासाठी इतर शासकीय विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक