जिल्हा प्रशासन लागले मान्सून पूर्वतयारीला; जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

मागील अनुभवांचा अभ्यास करून झिरो लॉसचा संकल्प करावा

 


अलिबाग, दि.22 (जिमाका):- आजची ही आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा मान्सून पूर्व तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. मागील काही काळात घडलेल्या नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करावा आणि मनुष्य व संपत्तीच्या झिरो लॉसचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज येथे केले.

मान्सून-2022 पूर्वतयारी आढावा बैठक व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, विविध शासकीय कार्यालयांचे कार्यालयप्रमुख, यशदाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राचे संचालक कर्नल सुपणेकर, कोस्ट गार्डच्या चांदनी चॅटर्जी, एनडीआरएफ चे डी.महेशकुमार, जीएसआय चे सैकत रॉय उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर पुढे म्हणाले की, सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे आणि संपर्क क्रमांक हे अद्यावत करावेत. नियंत्रण कक्ष सुरू करावेत व ते 24×7 कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी संबंधित विभागाने साधन-सामुग्री व मनुष्यबळासह तात्काळ प्रतिसाद द्यावा. विभागाकडील आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यक असलेले साधन सामुग्री/साहित्य व्यवस्थित कार्यरत ठेवावेत. साहित्य वापरणाऱ्या व्यक्तींचे संपर्क क्रमांक नियंत्रण कक्षात ठेवाव्यात. पर्जन्यमान, समुद्राची भरती व धरणातील विसर्ग या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून पूरग्रस्त भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी वेळेत स्थलांतर करावे. पूर व दरड कोसळण्यास अतिवृष्टी कारणीभूत असल्याने पर्जन्यमापकद्वारे प्राप्त माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावी.

ते पुढे म्हणाले की, गावपातळीवर युवकांचे गट स्थापन करून त्यांना प्रशिक्षण द्यावे, पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर लक्ष ठेवावे. जेणेकरून पूरप्रवण व दरड प्रवण भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी वेळेत स्थलांतर करणे शक्य होईल. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार इन्सिडेंट कमांडर असल्याने त्यांना सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन नैसर्गिक आपत्तीत तात्काळ मदत करावी. सर्व साहित्य सुरक्षित असल्याची खात्री करावी. प्रत्येक महत्वाच्या बाबींसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. बोट, लाईफ जॅकेट, स्पीड बोट, जनरेटरसह जेसीबी, रुग्णवाहिका, पोकलेन, टँकर, वूडकटर व मनुष्यबळ इत्यादी आपत्कालीन साहित्य तात्काळ उपलब्ध होईल, याचे नियोजन करावे. सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालयात उपस्थित राहावे. मागील घडलेल्या घटनांमध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारे त्यापेक्षा अधिक पूर्वतयारी राहील याचे काटेकोर नियोजन करावे.

कोणत्याही गोष्टीसाठी प्रशिक्षण महत्वाचे असल्याचे सांगून प्रत्येक गावात युवकांचे पथक तयार करावे. त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे व बचावकार्याचे प्रशिक्षण द्यावे. नैसर्गिक आपत्तीत काम करण्याविषयीची मार्गदर्शक तत्वे सर्वांना समजावून सांगावीत. ही मार्गदर्शक तत्वे दर्शनीय भागात सर्वत्र प्रदर्शित करावीत. प्रत्येक लहानसहान बाबींसाठी मॉक ड्रील आयोजित करावे. सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहावे. शाळा किंवा तत्सम निवारागृहे सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, असे ते म्हणाले.  

यावेळी उपस्थितांना कर्नल सुपणेकर यांनी इन्सिडन्ट रिस्पॉन्स सिस्टम या विषयावर आणि जीएसआय चे सैकत रॉय यांनी पर्जन्यदृष्टी व दरडप्रवण क्षेत्र याविषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती दिली. तसेच अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनीही तळीये, साखर सुतारवाडी, केवनाळे व महाडचा पूर या दुर्घटनांमधून काय शिकलो आणि आता नैसर्गिक आपत्तींशी मुकाबला करताना सर्व तयारीनीशी कशाप्रकारे तत्पर राहावे, याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेच्या निमित्ताने एनडीआरएफ व कोस्ट गार्डच्या उपस्थित अधिकाऱ्यांनीही नैसर्गिक आपत्तीत करावयाच्या कार्यवाहीविषयी उपस्थित अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक