केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी; जिल्ह्यात एकूण 1 लाख 73 हजार 890 लाभार्थ्यांनी केली नोंदणी

अलिबाग, दि.27 (जिमाका):- शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियांस रु.2 हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत एकूण रु.6 हजार प्रति वर्ष लाभ अनुज्ञेय आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 1) जमीन धारण करणारी संस्था, 2) संविधानिक पद धारण करणारे/ केलेले आजी/माजी व्यक्ती, 3) आजी/माजी मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा/राज्यसभा आजी/माजी सदस्य, विधानसभा/ विधान परिषद आजी/माजी सदस्य, महानगरपालिकेचे आजी/माजी महापौर, जिल्हा परिषदेचे आजी/माजी अध्यक्ष, 4) केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील नियमित अधिकारी/ कर्मचारी (चतुर्थ श्रेणी/गट-ड वर्गातील कर्मचारी), 5) मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, 6) निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रु.10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (चतुर्थ श्रेणी/गट-ड वर्गातील कर्मचारी वगळून), 7) नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट), वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्ट) इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती पात्र असणार नाहीत.

रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 1 लाख 73 हजार 890 लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केली असून, माहे फेब्रुवारी 2019 ते मार्च 2022 या कालावधीत 10 हप्त्यांमध्ये रक्कम रु.2 अब्ज 75 कोटी 25 लक्ष 70 हजार लाभ वितरीत करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यास मदत झाली आहे.

पी.एम. किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील एप्रिल-जुलै 2022 या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी e-KYC प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना e-KYC करण्यासाठी OTP किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले असून, लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर OTP पध्दतीने किंवा ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने e-KYC प्रमाणीकरण करु शकतील.

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आझादी का अमृत महोत्सव यांतर्गत दि.31 मे 2022 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत अकराव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असून पंतप्रधान श्री.मोदी योजनेच्या काही निवडक लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.

तरी, सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी e-KYC प्रमाणीकरण पूर्ण करावे तसेच ज्या लाभार्थीची पी. एम. किसान पोर्टलवरील माहिती चुकीची असल्यामुळे लाभाची रक्कम प्राप्त झालेली नाही, अशा लाभार्थीनी आपले आधारकार्ड, बँक खाते पुस्तिकेची सुस्पष्ट प्रत व जमिनीच्या कागदपत्रांसह (7/12 इत्यादी) नजीकच्या तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषीसेवक यांच्याशी संपर्क साधून, पी.एम. किसान पोर्टलवरील माहिती दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व निवासी उपजिल्हाधिकारी (अतिरिक्त कार्यभार) श्री.सर्जेराव मस्के-पाटील यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक