अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात 133 तरूण नव उद्योजक

10 कोटीचे 67 लाख रुपयांचे कर्ज वाटप, 1 कोटी, 19 लाख रुपयांचा व्याज परतावा

 

अलिबाग, दि.09 (जिमाका):- मराठा समाजातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध्‍ा करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने जिल्हयात 133 तरूणांना नवउद्योजक होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

विविध बँकांकडून वेगवेगळया व्यवसायासाठी तब्बल 10 कोटी 67 लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले असून त्यावरील 1 कोटी 19 लाख रूपयांचा व्याज परतावा महामंडळाने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्यक्ष लाभ दिला आहे. कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांना बँकेकडे कर्जाचा हफ्ता व व्याजाची रक्कम नियमित भरल्यानंतर व्याज परतावा देण्यात येतो. जिल्हा कौशल्य विेकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग या कार्यालयामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.

व्यवस्थापकीय संचालक श्री.एम.व्ही. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाचे कामकाज सुरु आहे, अशी माहिती रायगड जिल्हा समन्वयक श्रीमती अंजली पाटील यांनी दिली.

या महामंडळाकडून सन 2017 पासून राज्यभर मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी शून्य टक्के व्याज दराने अर्थसहाय्य दिले जात आहे. किराणा दुकान, कटलरी व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म, शेळी पालन, वॉटर प्युरिफायर, ट्रान्सपोर्ट, टूर अँड ट्रॅव्हल्स, मोबाईल व्हॅन अशा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या तरुणांना उद्योजक म्हणून घडविण्याचे काम या महामंडळाद्वारे केले जात आहे.

 

महामंडळाचे काम अविरत

महामंडळाच्या कर्ज मंजुरीनंतर बँकांकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या बिगर व्याजी अर्थसहाय्याची मुदत पाच वर्षांसाठी असल्याने लाभार्थ्यांमध्ये उत्साह आहे. बँकांकडून येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक श्री.एम.व्ही. मोहिते यांनी पुढाकार घेतला आहे.

लाभार्थ्यांनी व्यवसायावर लक्ष केंद्रित करुन आपल्यासह परिवाराची उन्नती साधावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अमिता मु.पवार यांनी केले आहे.

 

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक