सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहे व निवासी शाळेतील मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

अलिबाग, दि.12 (जिमाका):- समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, महाड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तळा, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह महाड, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पनवेल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पाली अशी 07 शासकीय वसतिगृहे व अनुसुचित जाती नवबौध्द मुलांकरिता शासकीय निवासी शाळा, जावळी ता.माणगाव ही 01 निवासी शाळा कार्यरत आहे.

शासकीय वसतिगृहात गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. याबाबत आरक्षण अनुसूचित जाती- 80 % अनुसूचित जमाती- 03 %, विमुक्त जाती, भटक्या जमाती- 05%, विशेष मागास प्रवर्ग- 02 %, आर्थिकदृष्ट्या मागास- 05 %, अनाथ- 03%, अपंग- 02%

मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशितांकरिता लेखन साहित्याकरिता रु.4 हजार शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता दरमहा रु.500 निर्वाहभत्ता, शालेय/महाविद्यालयीन शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाच्या दोन संचाकरिता गणवेष भत्ता, प्रोजेक्ट रिपोर्ट/शैक्षणिक सहल भत्ता, ॲप्रन भत्ता ही वसतिगृह / निवासी शाळेची वैशिष्ट्ये आहेत.

प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता रु.02 लाख 50 हजार च्या आत असलेले तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग घटकातील विद्यार्थ्यांकरिता रु.1 लाखाच्या आत असलेले प्रमाणपत्र, अर्जासोबत संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांच्या सहीचा सन 2021-22 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, बँक खाते नोंदवहीची (पासबुक) झेरॉक्स, आधारकार्डची झेरॉक्स ही कागदपत्रे या वसतिगृह / निवासी शाळेच्या प्रवेशाकरिता आवश्यक आहेत.

वसतिगृहात राहाणाऱ्या मुलामुलींकरिता प्रवेश इ.08 वी पासून पुढे, मांग, भंगी, कातकरी व माडिया गोंड या जातीमधील मुलामुलींकरिता इ.05 वी पासून देण्यात येतो. निवासी शाळेतील मुलांकरिता इ.06 वी पासून इ.10 वी पर्यंत शाळा आहे. विहित नमुन्यातील अर्ज सर्व शासकीय वसतिगृहांच्या कार्यालयामध्ये विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांचे कार्यालय, कच्छी भवन, नमीनाथ जैन मंदिर, सेंट मेरी शाळेसमोर, श्रीबाग रोड या पत्यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक