एकात्मिक आदिवासी विकास साधणारा प्रकल्प रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम होत असल्याचा अभिमान - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

सुधागड तालुक्यातील माणगाव खुर्द येथे आदिम जमातीचे बहुउद्देशीय संकुल उभारण्यासाठी जागा प्रदान

अलिबाग, दि.25 (जिमाका):- रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील मौजे माणगांव खुर्द येथील सुमारे 17 हेक्टर गुरचरण जमीन आदिम जमातीच्या बहुउद्देशीय संकुल उभारणीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांना प्रदान करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील कातकरी या आदिम जमातीमधील सुमारे 37 हजारांहून अधिक कुटुंबांचा विकास यामुळे होणार आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या आदिम जमातीस विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या बहुउद्देशीय संकुल उभारणीची प्रक्रिया राज्यात सर्वप्रथम रायगड जिल्ह्यात होत असल्याने जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण व गौरवास्पद बाब असल्याने अभिमानाची भावना जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबतची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनी 2021 च्या अर्थसंकल्पात केली होती. त्याची अंमलबजावणी होत असताना या प्रकल्पासाठी अनुकूल जागा महसूल विभागाकडून उपलब्ध करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील लोकोपयोगी उपक्रम, शासकीय बांधकामे यासाठी शासकीय जमीन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यासाठी पालकमंत्री कु.तटकरे यांनी आभार व्यक्त केले.

 आदिम जमातीच्या बहुउद्देशिय संकुलामध्ये इ. 1 ली ते 12 वी करीता 1 हजार विद्यार्थ्यांसाठी  निवासी शाळा, 500 मुलांच्या राहण्याची  क्षमता असलेले वसतीगृह, 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय, 200 खाटांचे  बहुउद्देशीय रुग्णालय, 500 लोकांच्या क्षमतेचे सभागृह, तंत्रशिक्षण-कौशल्य विकास, 1 हजार मे.टन क्षमतेचे साठवणूक गोदाम, 200 कर्मचारी निवासस्थाने, शेती व शेळीपालनासाठी कृषी कौशल्य विकास केंद्र, वनधन प्रक्रिया केंद्र, बागबगीचा-खेळ मैदाने, संरक्षक भिंत, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, सोलार संयंत्रे, मलनिस्सारण केंद्र, वाहनतळ,  संकुलासाठी अंतर्गत रस्ते व इतर सुविधांसह आदिवासी  निर्मित वस्तूंचे प्रदर्शन केंद्र अशा विविध सुविधांचा समावेश या बहुउद्देशीय संकुलामध्ये असणार आहे. त्यानुसार मौजे माणगांव खुर्द येथे जिल्ह्यातील आदिम जमातीच्या सर्वांगिण विकासाच्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करुन आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.

 राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमध्ये रायगड जिल्ह्याचा प्राधान्याने विचार करुन शासनाचे सहकार्य लाभत असल्याने समाधान व्यक्त करतांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार यानिमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड