पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

रायगड जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन

 


अलिबाग,दि.31 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. रायगड जिल्ह्यात या कार्यक्रमाचे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून येथील पी.एन.पी नाट्यगृह येथे थेट प्रक्षेपण करण्यात आले.



यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे या ऑनलाईन तर अलिबाग येथील पी.एन.पी नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पनवेल महानगरपालिका महापौर डॉ.कविता चौतमोल, पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ.गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अमित सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी श्याम पोशट्टी, पनवेल महानगरपालिका उपायुक्त सचिन पवार, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता सुधीर वेंगुर्लेकर, तहसिलदार विशाल दौंडकर, राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, मुख्याधिकारी जीवन पाटील, अंगाई साळुंखे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.कुलकर्णी, विविध राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी तसेच इतर विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.


दरम्यान, गरीब कल्याण संमेलन अंतर्गत सिमला येथे पंतप्रधानांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी देशभरातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. देशातील नागरिकांचा सन्मान, सुरक्षा, समृद्धी, कल्याणासाठी संकल्प करीत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. गेल्या आठ वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून देशातील सामान्य नागरिकांना कशा प्रकारे लाभ मिळाला आहे, याबाबत त्यांनी माहिती दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत राज्याच्या ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनी विविध योजनांच्या औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले की, योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थ्यांपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या. केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारच्या योजनांमध्ये राज्य सरकारचा 40 टक्के हिस्सा असल्याचेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्य शासनातर्फे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध स्तरांवर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनीदेखील विविध लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

रायगड जिल्ह्यात योजनांची प्रशासकीय यंत्रणांकडून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, पुढील कालावधीत योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर शासकीय रुग्णालय यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्यसेवा आणखी बळकट करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यावेळी म्हणाले की, विविध योजनांच्या माध्यमातून शासन जनतेपर्यंत पोहोचत आहे. जल जीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा योजना यासह विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत माझी वसुंधरा मार्फत पर्यावरण बाबींची अनुषंगिक पूर्तता करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने संपूर्ण भारत बलवान करण्याचे काम केले आहे. स्वच्छ भारत योजनेतंर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेघरांना घरे मिळावून दिली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आल्याची माहिती पनवेल महानगरपालिका महापौर डॉ.कविता चौतमोल यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांगितले की, जनतेच्या शाश्वत विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना असून, यामधून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यासह इतर आवश्यक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. जिल्ह्यात घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन बाबत मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. जिल्ह्यात 77 टक्के कुटुंबांना वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यात आले आहे. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात घरकुलांचे निर्माण करण्यात आले. मागील वर्षभरात 3 हजार बचतगट निर्माण करून महिलांचे आर्थिक व सामाजिक बळकटीकरण करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमरदीप ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक