जिल्ह्यात दि.25 जून ते दि.01 जुलै 2022 या कालावधीत होणार कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन

 


अलिबाग,दि.23 (जिमाका):- कृषी तंत्रज्ञानामधील एखादी छोटी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते. खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील कृषी विभागाचे अधिकारी/ कर्मचारी, कृषी विभाग जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे/ कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषीमित्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत.

त्यानुसार दि.25 जून ते दि.01 जुलै 2022 या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देवून कृषी संजीवनी मोहीम साजरा करण्यात येणार आहे.

कृषी संजीवनी मोहिमेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:-

दि.25 जून 2022 - विविध पिकांची तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी बळकटीकरण दिन, दि.26 जून 2022- पौष्टिक तृणधान्य दिवस, दि.27 जून 2022 - महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन, दि.28 जून 2022 - खत बचत मोहीम, दि.29 जून 2022 - प्रगतशिल शेतकरी संवाद, दि.30 जून 2022 - शेती पूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस, दि.01 जुलै 2022 - कृषी दिन साजरा करुन कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप.

या मोहिमेच्या कालावधीमध्ये संबंधित विषयांबाबत जिल्ह्यात प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार असून गावोगावी शेतीशाळा, चर्चासत्र, वेबिनार, प्रात्यक्षिके, सभा प्रशिक्षण, शिवारफेरी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील रिसोर्स बँकेतील पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांचे सुध्दा मार्गदर्शन या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावाच्या कृषी सहाय्यक तसेच नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती बाणखेले यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक