रायगड जिल्हा प्रशासनाची “परिवर्तन” कार्यपुस्तिका फ्लिपिंग ई-बुकच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध


अलिबाग, दि.01 (जिमाका):- रायगड जिल्हा प्रशासनाने जानेवारी ते एप्रिल 2022 या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांची माहिती देणारी परिवर्तन (भाग 2) ही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कार्यपुस्तिका फ्लिपिंग ई-बुकच्या माध्यमातून सर्व नागरिकांना https://raigad.gov.in/en/parivartanebook/ या लिंकवर वाचण्याकरिता विनामूल्य उपलब्ध आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी दि.01 मे 2022 रोजी संपन्न झाले. तसेच सप्टेंबर ते डिसेंबर 2021 या कालावधीतील राबविलेल्या उपक्रमांची माहिती देणारी परिवर्तन (भाग 1) ही कार्यपुस्तिकादेखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर 24 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी पदी रुजू झाल्यानंतर प्रशासन म्हणून जनतेच्या जीवनात खरा बदल घडवून आणण्यासाठी, अगदी शेवटच्या व्यक्तीच्या चेहन्यावर समाधानाचं हास्य फुलविण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनातील सर्वांनी ऑगस्ट-सप्टेंबर 2021 महिन्यात परिवर्तन घडवून आणण्याची मनाशी खूणगाठ बांधली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कामकाजास उत्साहाने सुरुवात केली.

शेतकरी, कातकरी आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कातकरी उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्री च्या माध्यमातून कातकरी बांधवांसाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. यात विविध प्रकारचे शासकीय दाखले वाटप, आरोग्य शिबिर वैद्यकीय उपचार, शासकीय स्वयंरोजगार निर्मिती आदी उपक्रमांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील युवक-युवर्तीमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी जागरूकता बऱ्याच प्रमाणात कमी असल्याचे जाणवले. त्यांच्यातही जागरुकता वाढावी या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याचे निश्चित केले आणि गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ही संकल्पना अस्तित्वात आली. स्पर्धा परीक्षा केंद्राच्या जवळपास सात-आठ हजार विद्यार्थी रायगडमध्ये मुले-मुली प्रशासनाच्या या संकल्पनेचा विनामूल्य थेट लाभ घेत आहेत.

निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी शासन माझी वसुंधरा हे अभियान राबवीत आहे. शासनाने सुचविलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे रायगड जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक व जिल्हा प्रशासनातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्ह्यात माझी वसुंधरा, कातकरी उत्थान अभियान आणि गरुडझेप स्पर्धा परिक्षा केंद्र हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. परिवर्तनाचा दुसऱ्या अंकात या उपक्रमांची तसेच या कालावधीत जिल्ह्यातील इतर महत्वाच्या शासकीय कार्यक्रमांचीही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील परिवर्तन (भाग 2) ही रायगड जिल्हा प्रशासनाची कार्यपुस्तिका जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी संपादित केली आहे तर राष्ट्रीय सूचना आणि विज्ञान केंद्राचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री.चिंतामणी मिश्रा यांनी फ्लिपिंग ई-बुकच्या माध्यमातून सर्व नागरिकांना https://raigad.gov.in/en/parivartanebook/ या लिंकवर वाचण्याकरिता उपलब्ध करून दिले आहे.

तरी नागरिकांनी ही पुस्तिका जरूर वाचावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक