अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध उपक्रमांद्वारे जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

 


अलिबाग, दि.01 (जिमाका):- जगभरात 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून अलिबाग जिल्हा रुग्णालयात काल (दि.31 मे) रोजी विविध जनजागृतीपर उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला.

सकाळी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विरोधी रॅलीचे आयोजन अलिबाग शहरातील बाजारपेठ, दुकान व वस्ती परिसरातून करण्यात आले.  यात सहभागी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तंबाखू विरोधी घोषणा देऊन अलिबागकारांचे लक्ष वेधले. या रॅलीला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई यांनी झेंडा दाखविला. या दिनानिमित्त अलिबाग नर्सिंग कॉलेज मध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम दर्शविणाऱ्या पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी त्या पोस्टरचे प्रदर्शन लावण्यात आले.

या कार्यक्रमासाठी न्यायाधीश तथा अलिबाग विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव श्री.अमोल शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद गवई हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर व्यासपीठावर प्रशासकीय अधिकारी श्री.धमोडा, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम सल्लागार डॉ.विकास पवार, डॉ.देशमुख, मेट्रेन सौ.अनिता भोपी, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सौ.म्हात्रे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात पोयनाडच्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी गीत गावून केली. त्यानंतर नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थांनी पथनाट्याद्वारे तंबाखूचे सेवनाच्या दुष्परिणामांबाबत रुग्ण आणि प्रेक्षकांचे प्रबोधन केले. यावेळी स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि पोयनाड शाळेच्या विद्यार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मुख कर्करोग आणि त्याविषयीच्या तपासणीबाबत डॉ.देशमुख यांनी माहिती दिली, तर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई यांनी तंबाखूचे दुष्परिणाम केवळ व्यसन करणारा नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबावर होतात त्याचबरोबर या व्यसनापासून कसे दूर राहता येईल, निरोगी आयुष्य कसे जगता येईल याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

न्यायाधीश तथा अलिबाग विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव श्री.अमोल शिंदे यांनी तंबाखू विरोधी गीत सादर करणाऱ्या मुलांचे कौतुक केले आणि तरुणांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेवक सुशील साईकर यांनी केले तर आभार समुपदेशक हितेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी तंबाखूपासून दूर राहण्याची शपथ डॉ.प्रमोद गवई यांनी सर्वांना दिली.

जागतिक तंबाखू विरोधी दिन (31 मे) साजरा करण्यासाठी आणि आयोजनासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.सागर काटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक