तळीये पुनर्वसन कामाच्या पाहणी दौऱ्यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न

दरडग्रस्त तसेच जिल्ह्याच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर वृक्ष व बांबू लागवड 

करण्याचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प

 

अलिबाग, दि.10 (जिमाका):- गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड यांनी दि.08 जून 2022 रोजी तळीये येथे भेट दिली. यावेळी त्यांनी तळीये दरडग्रस्तांसाठी सुरू असलेल्या पुनर्वसन कामाचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दरम्यान गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्तेही वृक्षारोपण संपन्न झाले. जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरडग्रस्त तसेच जिल्ह्याच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर वृक्ष व बांबू लागवड करण्याचा संकल्प केला आहे.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांच्या अहवालात दरडप्रवण क्षेत्रात भू:स्स्खलन आणि दरड पडण्याचा धोका कमी करण्याकरिता रायगड जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. सन 2022 मध्ये रायगड जिल्हा परिषदेद्वारे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बांबू लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच शाळा कॉलेज व इतर शासकीय व अशासकीय संस्थांद्वारे तसेच सामाजिक वनीकरण विभागाद्वारे मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीचे नियोजन आहे.

महाड व पोलादपूर तालुक्यातील तळीये, मधलीवाडी, ता.महाड - 5 हेक्टर, तळीये, तळीये, ता.महाड - 4 हेक्टर, मोरेवाडी, (शिंगरकोंड), ता.महाड - 10 हेक्टर, चांडवे खुर्द ता.महाड - 10 हेक्टर, साखर, चव्हाण वाडी, ता.पोलादपूर - 11 हेक्टर, साखर आदिवासी वाडी, ता.पोलादपूर - 5 हेक्टर, साखर, पेढे वाडी, ता.पोलादपूर - 5 हेक्टर या गावात प्राधान्याने बांबू लागवड करण्यात येणार आहे.

पुनर्वसित मौजे तळीये गावाकरिता विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, शाळा, अंगणवाडी, बाजारपेठ, समाज मंदिर, स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक शौचालय, व्यायामशाळा, अंतर्गत रस्ते, बारसगाव तळीये रस्ता रुंदीकरण, मलनि:स्सारण व गटार, एस.टी. बस थांबा, स्मशानभूमीकडे जाणारा जोड रस्ता, तळीये दरडग्रस्त स्मारक या सार्वजनिक सोयीसुविधा मंजूर करण्यात आल्या असून याबरोबरच या परिसरात झाडांची लागवड देखील तितकीच महत्वाची असल्याचे लक्षात घेवून या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यांच्या हस्ते वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.नितीन महाजन, मुख्य अभियंता श्री.जाधव, म्हाडाचे कार्यकारी अभियंता श्री.फाये, जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता श्री.बारदस्कर, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्री.मोहिरे, जिल्हा परिषद माजी सदस्य मनोज काळीजकर, सरपंच श्री.संपत तांदळेकर, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशीद, ट्रान्सकॉन डेव्हलपर्सचे श्री.सुदिप्ता दास तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व तळीये ग्रामस्थ उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक