कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक माहिती सादर करावी

 

अलिबाग, दि.08 (जिमाका):- कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याकरिता योजना आखली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना सहाय्य प्रदान करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येत आहे.

तथापि यातील काही अर्जदारांचा तपशील बरोबर नसल्याने अथवा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने सानुग्रह सहाय्याची रक्कम अर्जदारांच्या खात्यात जमा झाली नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याकरिता राज्य शासनाकडून सानुग्रह अनुदान वितरीत करताना बँकेकडून प्राप्त झालेल्या तपशिलाच्या आधारे बँकेकडून नाकारण्यात आलेल्या अर्जाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

त्यानुषंगाने ज्या अर्जदारांचे अर्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आलेले आहेत, परंतू अद्याप अर्जदारांच्या खात्यावर सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही, अशा अर्जदारांनी त्यांचे आधार क्रमांकाशी जोडलेल्या खाते क्रमांकाची (अर्जाचा क्रमांक, अर्जदाराचे नाव, आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्याचा क्रमांक, बँकेचे नाव, शाखा, आयएफएससी क्रमांक (IFSC) इ.) माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास covid19reliefraigad@gmail.com या ईमेल आयडीवर सादर करावी तसेच अधिक माहितीसाठी 02141-222097 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक