पोलादपूर तालुक्यात तहसिलदार दीप्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणेची आपत्ती व्यवस्थापन तयारी पूर्ण

 


 

अलिबाग, दि.01 (जिमाका):- मान्सूनच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तींना अधिक समर्थपणे तोंड देण्यासाठी गावपातळीपासून ते तालुकापातळीपर्यंत ग्रामस्तावरील, अधिकारी व संस्था यांचा योग्य प्रकारे समन्वय राखणे, प्रत्येकाच्या क्षमतेचा योग्य वापर करणे व उपलब्ध साधन सामग्रीचा कार्यक्षम रितीने उपयोग करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर तालुक्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे.

पोलादपूर तालुक्यात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तहसिलदार दीप्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सूनपूर्व तयारी पूर्ण झाली असून आपत्ती व्यवस्थापनाबाबत योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.

पोलादपूर तालुका हा रायगड जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात छोटा तालुका आहे. हा तालुका राज्य शासनाने संपूर्ण डोंगरी म्हणून घोषित केला आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये एकूण तीन महसूल मंडळे व 20 तलाठी सजे मध्ये मिळून 88 गावामध्ये 212 वाड्यांचा समावेश होतो. 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या 45 हजार 464 एवढी आहे. पोलादपूर तालुक्याच्या हद्दीलगत महाड, खेड, या दोन तालुक्याची व सातारा जिल्हयाची हर जोडून आहे. तालुक्यामध्ये प्रामुख्याने शेती हाच एकमेव व्यवसाय असून भात हे प्रमुख पिक आहे. तालुक्यामधून सावित्री ही एक प्रमुख नदी वाहते. त्यांच्या काठावरील एकूण 4 गावांना कमी अधिक प्रमाणामध्ये पुराचा धोका संभवतो, तसेच याशिवाय तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. 66-(मुंबई-गोवा) रस्ते अपघाताची शक्यता विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. सन 1989, 2005 व 2021 साली अतिवृष्टी व पूरामुळे तालुक्यात अतोनात जीवित व वित्तहानी झाली होती.

या तालुक्यातील नागरिक सेवाभावी, शांतताप्रिय व सहकार्याच्या भावनेने काम करीत असल्याने यापूर्वीच्या आपत्तीमध्ये लोकसहभागातून यशस्वीपणे तोंड देता आले. तथापि मान्सूनच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तींना अधिक समर्थपणे तोंड देण्यासाठी गावपातळीपासून ते तालुकापातळीपर्यंत ग्रामस्तावरील, अधिकारी व संस्था यांचा योग्य प्रकारे समन्वय राखणे, प्रत्येकाच्या क्षमतेचा योग्य वापर करणे व उपलब्ध साधन सामग्रीचा कार्यक्षम रितीने उपयोग करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची मान्सूनपूर्व बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार आगामी मान्सून आपत्ती काळात प्रशिक्षित मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध होण्यासाठी पोलादपूर तालुक्यात दि.17 व दि.18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. नागरी संरक्षण दल (NDRF) उरण यांच्यामार्फत प्रशिक्षणार्थी पूर, दरड मध्ये अडकल्यास सुटका करणे, जखमी व्यक्तींना प्रथमोपचार, दोरखंडाच्या विविध गाठीचा वापर संकट काळात करणे, स्ट्रेचर चा वापर आदी बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.

महाड येथे सर्व शासकीय कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील, स्वयंसेवक यांचे एनडीआरएफ (NDRF) मार्फत दि.08 मार्च 2022 रोजी एक दिवशीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे.

पोलादपूर तालुक्यात सर्व तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक नैसर्गिक आपत्ती बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी आपत्ती दरम्यान करावयाच्या कार्याबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

भारतीय भूवैज्ञानिक संस्था, शाखा पुणे यांच्यामार्फत पोलादपूर तालुक्यातील गाव/ वाड्याची पाहणी करण्यात आले असून त्यांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या अहवालांमध्ये नमूद सूचना व उपययोजना अंमलात आणण्याकरीता जनजागृती करण्याच्या उद्देशाने उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करण्यात आला.

दि.13 मे 2022 रोजी क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची मान्सून पूर्व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मान्सूनपूर्व कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांना तालुक्यातील सर्व गावात घरोघरी भेटी देऊन नागरिकांना नैसर्गिक आपत्तीमध्ये उद्भवणाऱ्या घटनेबाबत जागरूक करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, पुणे शाखा यांच्यामार्फत सुचविलेल्या बचावात्मक उपाययोजना करण्याकरिता सुचविलेल्या कामांचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत प्राप्त झाले असून ही अंदाजपत्रके जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आली आहेत.

मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी तालुक्यातील सरपंच, व्यापारी, डॉक्टर, पोलीस पाटील, स्वयंसेवकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

तालुक्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त भागातील नागरिकांना आपत्ती काळात स्थलांतरीत करता यावे, म्हाणून एकूण 36 कायमस्वरूपी निवारा शेडकरीता प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, महाड यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.

दरडग्रस्त व पूरग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा व समाज मंदीर, सभा मंडप यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरडग्रस्त व पूरग्रस्त भागात नागरिकांसाठी बचाव साहित्याची मागणी उपविभागीय अधिकारी, महाड यांच्याकडे करण्यात आली आहे.

अशा प्रकारे पोलादपूर तालुक्यात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तहसिलदार दीप्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सूनपूर्व तयारी पूर्ण झाली असून आपत्ती व्यवस्थापनाबाबत योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक