भारतीय रिजर्व बँक, मुंबई तर्फे अलिबाग येथे महिला बचतगटांकरिता मार्गदर्शन आणि आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन


 

अलिबाग, दि.07 (जिमाका):- वित्तीय समावेशन आणि विकास विभाग, भारतीय रिझर्व बँक, मुंबई कार्यालय यांच्या वतीने आणि बँक ऑफ इंडिया, जिल्हा अग्रणी बँक, रायगड यांच्या सहकार्याने हॉटेल होरीजोन, वरसोली, अलिबाग-रेवस रोड येथे काल (दि.06 जून) रोजी मार्गदर्शन आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचा उद्देश महिला बचतगट तसेच समाजातील इतर घटकांना बचतीचे महत्त्व, व्यवसायाची उभारणी, बँकांमार्फत व्यवसायासाठी लागणारे आर्थिक सहाय्य, मालासाठी तयार करावयाची घरगुती व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, निर्यातीसाठी आवश्यक मार्गदर्शन व उपलब्ध असलेल्या सरकारी योजना, इत्यादी बाबींवर सविस्तार चर्चा आणि मान्यवर व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले.

प्रादेशिक संचालक (Regional Director), श्री.अजय मिचयारी, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई कार्यालयाच्या महाव्यवस्थापक, श्रीमती कल्पना मोरे, बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर, श्री.सुब्रतोकुमार रॉय, बँक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर, श्रीमती शंपा बिस्वास, नाबार्डचे डीडीएम,श्री प्रदीप अपसुंदे, MSRLM चे जिल्हा व्यवस्थापक श्री.सिद्धेश राऊळ, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले, बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, श्री.विजय कुलकर्णी, लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर (RBI)  श्री.नरेंद्र कोकरे अशा मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचा उद्देश महिला बचतगटांना ऑनलाईन मार्केटिंग या माध्यमाची ओळख करून देणे तसेच ऑनलाईन मार्केटिंग कशी करायची याची रीतसर माहिती देणे हा होता. त्याचबरोबर आपला पदार्थ कशाप्रकारे बाजारात आणावा व त्याची पॅकिंग आणि ऑनलाईन डिलिव्हरी कशी करायची, याबद्दलही महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

श्री.समरेश साहा यांनी Google या संकेतस्थळावर आपली नोंद करून Online Market मध्ये व्यवसाय करण्यासाठीचे आवश्यक मार्गदर्शन केले.

भारतीय रिजर्व बँकेच्या महाव्यवस्थापक श्रीमती कल्पना मोरे यांनी समाजातील विविध घटकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळावा याबाबत त्यांचे कर्तव्य व अधिकार याची माहिती करून दिली. श्रीमती कल्पना मोरे यांनी महिलांनी पारंपरिक पदार्थ बनवत न राहाता वेगळा दृष्टिकोन आत्मसात करावा तसेच पॅकिंग आणि मार्केटिंगकडे लक्ष देऊन आपली प्रगती करावी, असे आवाहन केले.

भारतीय रिजर्व बँकेचे प्रादेशिक संचालक श्री.अजय मिचयारी यांनी भारतीय रिजर्व बँकेतर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देऊन महिला सक्षमीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली व प्रत्येक महिलेने या योजनांचा व्यवस्थित लाभ घेवून स्वतःची प्रगती साधण्याचे आवाहन केले.

अलिबागला समुद्र, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि सुपीक जमीन हे दैवी वरदान लाभलं आहे. आपण आपली इच्छाशक्ती व्यवस्थितपणे वापरली तर तुम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टी करुन देशाच्या प्रगतीला हातभार लावू शकता, असे सांगून त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी महिलांचे योगदान आणि त्यांना शासनामार्फत मिळणाऱ्या योजनांबद्दलची माहिती दिली.

श्री.राहुल जोशी, यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न खाद्य प्रक्रिया योजनेंतर्गत महिला बचतगटांना पॅकिंगचे महत्व सांगून त्यांना आपल्या पदार्थाला योग्य भाव मिळविण्यासाठी लागणारे तंत्र आणि तांत्रिक माहिती याबद्दल अवगत केले.

श्री.प्रदिप अपसुंदे यांनी नवीन उद्योजकांना नाबार्डतर्फे व शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे सुचविले. तसेच त्यांनी नाबार्डच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

श्रीमती उज्वला बाणखेले यांनी उपस्थितांना कृषी योजनांची माहिती देवून त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

बँक ऑफ इंडिया चे जनरल मॅनेजर श्री.सुब्रतोकुमार रॉय यांनी बँक ऑफ इंडियातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व येणाऱ्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या योजनांचीही माहिती दिली. विशेष म्हणजे दि.30 जून 2022 पर्यंत प्रलंबित असलेले सर्व महिला बचतगटांचे कर्ज मंजूरी प्रकरणे तातडीने मंजूर केले जातील, असे जाहीर केले.

 बँक ऑफ इंडिया च्या झोनल मॅनेजर श्रीमती शंपा बिस्वास यांनी महिलांचे कौतुक करून त्यांना व्यवसायाकडे वळण्याची विनंती केली.

 रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी RBI कहता है या जनजागृती उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा, सुरक्षित बँकिंग व्यवहार, डिजिटल बँकिंग ला प्राधान्य, स्वच्छ चलन धोरण तसेच चलनाचा मान कसा राखावा, याचे मार्गदर्शन, बँकिंग लोकपालांची कार्यप्रणाली बँक खातेदाराचे अधिकार इत्यादी बाबींवर सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री.अमोल कापसे संचालित नमन नृत्य संस्थेच्यावतीने कोळीगीत नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. श्री.नरेंद्र कोकरे यांनी आभार प्रदर्शन केले.

00000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक