जिल्हा अग्रणी बँकेद्वारा आयोजित “ग्राहक जनसंपर्क अभियान” कार्यक्रम उत्साहात संपन्न

अलिबाग, दि.09 (जिमाका):- वित्तिय सेवा विभाग, भारत सरकार, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ इंडिया लीड डिस्ट्रिक्ट बँक, रायगड यांच्या सहकार्याने हॉटेल होरिजन, खडताळ ब्रिज, अलिबाग-रेवस रोड, वरसोली, अलिबाग येथे काल (दि.08 जून 2022) रोजी ग्राहक जनसंपर्क अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा उद्देश समाजातील ग्राहकांना बँकेच्या सेवांबद्दल मार्गदर्शन व उपलब्ध असलेल्या सरकारी योजना, त्यांची माहिती समाजात देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचविणे, त्याचबरोबर सरकारी योजनांचा लाभ लोकांकर्यंत पोहोचविण्याचे उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे, लोकाभिमुख योजनांचा प्रसार आणि मान्यवर व्यक्तींकडून मार्गदर्शन करणे हा होता.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, बँक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर श्रीमती शंपा बिस्वास, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक (DDM) श्री.प्रदीप अपसूंदे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (MSRLM) चे जिल्हा व्यवस्थापक श्री.सिद्धेश राऊळ, उपविभागीय जिल्हा कृषी अधिकारी श्री.कैलास वानखेडे, जिल्हा उद्योग केद्रांमार्फत प्रबंधक श्याम चकोर, ओबीसी महामंडळ रायगडचे प्रबंधक निशिकांत नार्वेकर, मत्स्य व्यवसाय विभागाच्या, नोडल अधिकारी सोनल तोडणकर आणि जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, आर.सी.टी.संचालक श्री.आनंद राठोड तसेच सर्व बँकेचे शाखा अधिकारी, सर्व जिल्हा समन्वयक तसेच ग्राहकवर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.

यावेळी आपल्या प्रास्ताविकात जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी यांनी अशा ग्राहक मेळाव्यांद्वारे बँक आणि ग्राहक यांच्यामधील दरी कमी होण्यास निश्चितच मदत होईल आणि त्यामुळे ग्राहकांना अपेक्षीत सेवा लवकर मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील एकूण 535 बँक शाखांनी गेल्या वर्षी ठरवून दिलेल्या रु.4 हजार 228 कोटीचे उद्दिष्ट साध्य करताना 108 % कर्ज वाटप म्हणजेच रु.4 हजार 556 कोटी कर्ज वाटप केले. यावरून बँका ग्राहकांना अपेक्षीत सेवा देण्यास उत्सुक आहेत असा संदेशही यानिमित्ताने उपस्थितांना दिला.

ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशातील नागरिकांना समर्पित केलेला आहे. देशातील नागरिकांनी आत्मनिर्भर व्हावे. त्यासाठी सर्व बँकांनी बचतगट, शेतकरी, मुद्रा योजना, महामंडळाच्या योजना यांना कर्ज देताना प्राधान्याने विचार करावा, असे आवाहन करून वित्त वर्ष 2022-23 मध्ये देण्यात आलेला लक्ष्यांक रु.4 हजार 625 कोटी सुध्दा बँका आपल्या सर्व ग्राहकांना कमीत कमी वेळेत कर्ज वाटप करून उद्दिष्ट पूर्ण करतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी बँक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर श्रीमती शंपा बिस्वास म्हणाल्या की, गरजू लाभार्थ्यांना ज्या सरकारी सेवा, बँकिग सेवा अपेक्षित आहेत त्या वेळेत मिळाल्या तरच स्वातंत्र्याचा अर्थ सर्वांना समजेल. त्यामुळे बँकिग जे सेवा क्षेत्र आहे त्यामधून मिळणाऱ्या सरकारी योजना वेळेत लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँकांनी तत्पर राहावे. त्याबरोबरच जे लाभार्थी कर्ज काढून व्यवसाय करीत आहेत त्यांनी वेळेत कर्ज भरावे अणि आपला व्यवसाय वाढवावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री.कैलास वानखेडे यांनी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याविषयी मार्गदर्शन केले आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थितांना प्रोत्साहित केले.

या मेळाव्यानिमित्त जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गरजू लाभार्थ्यांना याचा कसा लाभ होईल याचीही माहिती उपस्थितांना देण्यात आली.

यावेळी नाबार्डचे नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक (DDM) श्री.प्रदीप अपसूंदे यांनी नाबार्डच्या विविध योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, बँकांनी नाबार्डमार्फत शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत कामासाठी पतपुरवठा करावा. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज विकसित होणे अत्यावश्यक आहे. यावेळी ग्राहकांनी सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात ओबीसी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती जिल्हा व्यवस्थापक श्री.नार्वेकर यांनी दिली आणि ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.

महाराष्ट्र राज्य उन्नती अभियान, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ यांनी बचतगटांना गेल्या वर्षी बँकांनी केलेल्या सहकार्यामुळे रायगड जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक पटकाविल्याबद्दल बँकांचे विशेष आभार मानले अणि यावर्षी सर्व बँकाच्या मदतीने रायगड जिल्हा राज्यात पहिला येण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमात 80 लाभार्थ्यांना 03 कोटी 54 लाखांचे मंजूरी पत्र देण्यात आले. यामध्ये उमेद अभियानातील महिला स्वयं सहाय्यता समूहाचा समावेश होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्ह्यातील बँकाचे स्टॉल व ओबीसी महामंडळाचे स्टॉल ग्राहकांना माहिती देण्यासाठी लावण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी उमेद अभियानातील सी.आर.पी., बँक सखी, स्वयं सहाय्यता समूहातील महिला सदस्या, मुद्रा लोन, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) चे लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. बँकेमध्ये उत्कृष्ट काम करणारे बँक मित्र, कर्मचारी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टार प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षिका मीना श्रीमाळी यांनी केले.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक