जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल स्पर्धा होणार दि.21 जुलै रोजी सुरु


अलिबाग,दि.14(जिमाका):- जगभरात कोरोनाचे संकट पसरल्याने जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्र कोरोनामुळे प्रभावित झाले आहेत. त्याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही पडलेला दिसून आला. मागील गेल्या दोन वर्षापासून शासकीय क्रीडा स्पर्धा झालेल्या नाहीत. विविध स्तरावरील स्पर्धा, शिबिरे, प्रशिक्षण इत्यादी कोविड कालावधीत बंद राहिल्याने क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दरवर्षी रायगड जिल्ह्यातील हजारो खेळाडू, विविध क्रीडा स्पर्धा व शिबिरांमध्ये सहभागी होत असतात, त्यांना याचा खरा फटका बसला आहे.

आता जग कोरोनाच्या सावटातून सावरत असून पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्र उभारी घेत आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पनवेल महानगर पालिका यांच्या वतीने जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल स्पर्धांचे आयोजन कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी येथे करण्यात आले असून या स्पर्धांना दि.21 जुलै 2022 रोजी सुरुवात होणार आहे. या स्पर्धा 14 वर्षाखालील मुले, 17 वर्षाखालील मुले व मुली या दोन वयोगटामध्ये खेळविण्यात येणार आहेत. 14 वर्षाखालील मुले (सब ज्युनियर) वयोगटासाठी जन्मतारीख – दि.01 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असावा तर 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनियर) वयोगटासाठी जन्मतारीख – दि.01 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असणे बंधनकारक आहे.

रायगड जिल्ह्यातील ज्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघांना या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी विहीत नमुन्यातील आपले प्रवेश अर्ज (रायगड जिल्ह्याकरिता) raigadgames@gmail.com या ईमेलवर तर (पनवेल मनपा क्षेत्र) pmc.sports.cultural@gmail.com  या ईमेलवर सादर करावेत.

स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे 1) विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह 2) संघातील सर्व खेळाडूंच्या जन्मदाखल्याची छायाप्रत, आधारकार्डची छायाप्रत व बोनाफाईड प्रमाणपत्र. सर्व संघांना प्रवेश अर्ज सादर करण्याचा अंतिम दि.19 जुलै 2022 असा राहील. त्यानंतर सादर होणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

रायगड जिल्हा फूटबॉल असोसिएशन यांचे तांत्रिक सहकार्य या स्पर्धांसाठी घेण्यात येत आहे. या स्पर्धांविषयीच्या अधिक माहितीसाठी (रायगड जिल्हा संपर्क) श्री.सचिन निकम, क्रीडा अधिकारी मो.क्र.8856093608, श्री.समीर रेवाळे, कर्नाळा स्पार्टस अकॅडमी मो.क्र.9766235250 तर (पनवेल मनपा क्षेत्र संपर्क) श्री.नामदेव पिचड, पनवेल मनपा, क्रीडा प्रमुख, मो.क्र.7977212962, श्रीमती मनीषा मानकर, क्रीडा मार्गदर्शक मो.क्र.9767499162, श्री.समीर रेवाळे, कर्नाळा स्पार्टस अकॅडमी मो.क्र.9766235250 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक