विशेष लेख: वीजेपासून राहा सावध.. “दामिनी अॅप” करील मदत..!


मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या कालखंडात विशेषतः माहे मे, जून व जुलै तसेच मान्सून पश्चात साधारणतः माहे ऑक्टोबर या महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह पूर्वमौसमी पाऊस हजेरी लावतो. मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच. तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था (आयआयटीएम) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता हे अॅप विकसित केले आहे. दामिनी अॅपसाठी आयआयटीएमने लाइटनिंग लोकेशन नेटवर्क हे मॉडेल विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून त्यांच्या परिसरातील वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते अर्धा तास आधी नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यांसह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारी नागरिकांची जीवितहानी टाळणे शक्य होणार आहे.

मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. यामध्ये विशेषतः शेतकरी व शेत मजूरांची संख्या अधिक आहे. विजांसह होणाऱ्या पावसाचे पूर्वानुमान शेतकऱ्यांना व नागरिकांना काही वेळ अगोदर समजावे, यासाठी हे दामिनी अॅप उपयोगी ठरणार आहे.

  • माहिती संकलनासाठी विविध भागात सेन्सर बसविण्यात आले आहेत.
  • या अॅपमुळे शेतकरी, नागरिकांना वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचे पंधरा मिनिट ते अर्धा तास आधी अचूक अंदाज मिळू शकतो.
  • हे अॅप जीपीएस (GPS) लोकेशन ने काम करीत असून वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी या ॲपमध्ये प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्राची दिशादर्शक स्थिती दर्शविण्यात येते.
  • विजा पडण्याची शक्यता तसेच वीज म्हणजे नेमके काय, वीज कोसळणे याची शास्त्रीय माहिती आणि विजेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी काय करायला पाहिजे, याचीही सविस्तर सचित्र माहिती दामिनी अॅपमध्ये देण्यात आली आहे.
  • या अॅपवर लोकेशन टाकल्यानंतर संबंधित भागात वादळी वारे अथवा विजेच्या गडगडांची शक्यता असल्यास ती माहिती बघायला मिळते.
  • या माहितीच्या आधारावर शेतकरी व नागरिक वेळीच सावध होऊन त्यांचा जीव वाचवू शकतात.

तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हे अॅप गुगल प्ले स्टोर मध्ये “Damini Lightning Alert” असे टाईप करून डाऊनलोड करावे तसेच स्थानिक पातळीवर गावस्तरीय कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही हे ॲप स्वत:डाऊनलोड करावे तसेच सामान्य नागरीक / शेतकरी यांनाही हे अॅप डाऊनलोड करण्यास मार्गदर्शन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी केले आहे.

 

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

रायगड-अलिबाग

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड