अन्..अमित कातकरीला मिळाला जातीचा दाखला..! ; जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील “कातकरी उत्थान” अभियानाची “फलश्रुती”


अलिबाग, दि.15 (जिमाका):- उरण तालुक्यातील सातघर कातकरीवाडी येथील अमित अमृत कातकरी या विद्यार्थ्याला औद्योगिक तंत्रशिक्षण संस्थेत (ITI) मध्ये प्रवेश हवा होता. परंतू त्याच्याकडे जातीचा दाखला नसल्याने त्याच्या आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास तांत्रिक अडथळा येत होता. ही बाब प्रा.राजेंद्र मढवी यांना समजल्यावर त्यांनी उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि नायब तहसिलदार नरेश पेडवी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमितचा अर्ज स्वतः भरून दिला. त्या अर्जावर चानजे ग्रामपंचायतीचे तलाठी तेजस चोरगे, मंडल अधिकारी श्री.भंडारी अन् आदिवासी विकास निरीक्षक श्री.पांढरे यांच्या स्वाक्षरीसह आवश्यक ते अभिप्राय घेतले.

सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अमितचा हा अर्ज सेतू कार्यालयात ऑनलाईन प्रक्रियेसाठी सादर करण्यात आला. तेथे सेतू कार्यालयातील श्रीमती शरयू यांनी ऑनलाईन प्राथमिक कार्यवाही पूर्ण केली. तहसील कार्यालयातील लिपिक श्रीमती सोनिया आणि श्री.गिरी यांनीही अमितचा अर्ज ऑनलाईन तपासून पुढील कार्यवाहीसाठी तहसिलदार श्री.अंधारे यांच्याकडे तातडीने पाठविला.

एका विद्यार्थ्याच्या तोही कातकरी समाजातील.. त्याच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेशासंबंधीची अडचण कर्तव्यतत्पर, संवेदनशील तहसिलदार श्री.भाऊसाहेब अंधारे यांनी लक्षात घेतली. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना कातकरी उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्रीच्या माध्यमातून कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यास वेळोवेळी प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी, कातकरी उत्थानासाठी तालुकास्तरावर दाखले वाटप मेळावे, आरोग्य शिबिरे, वन हक्क दाखले वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या अमित कातकरीच्या अर्जास न्याय मिळाला नसता तर नवलच..

एक प्रामाणिक, कार्यतत्पर अधिकारी अशी ओळख असलेले पनवेल उपविभागीय अधिकारी श्री.मुंडके यांनीदेखील अमितच्या अर्जास तात्काळ ऑनलाईन मंजूरी देवून अमितला जातीचा दाखला मिळवून दिला.

विशेष म्हणजे ही संपूर्ण कार्यवाही फक्त एका दिवसात पूर्ण करण्यात आली. त्यामुळे अमित अमृत कातकरी या विद्यार्थ्याचा आयटीआय मधील प्रवेश सुकर झाला. हा जातीचा दाखला पनवेल उपविभागीय श्री.राहुल मुंडके यांच्या हस्ते आणि उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, आदिवासी मित्र प्रा.राजेंद्र मढवी, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या उपस्थितीत अमितला देण्यात आला.

अमित अमृत कातकरी या कातकरी समाजातील विद्यार्थ्याला आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटायझेशनचा प्रभावी वापर आणि सामान्य जनतेप्रती संवेदनशिलता या सर्वांच्या संगमातून मिळालेला जातीचा दाखला हे सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण ठरेल, यात शंकाच नाही.

00000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक