स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्यातून सुधागड तालुक्यातील आसरे कासरवाडी बनले “स्वप्नातील गाव”

अलिबाग, दि.27 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वदेस फाउंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये 75 स्वप्नातील गावे बनविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून सुधागड तालुक्यातील आसरे कासारवाडी हे गाव स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे.

स्वप्नातील गाव बनविण्याच्या संकल्पनेतून वाटचाल करीत असताना गावांमध्ये अनेक सामाजिक योजना स्वदेस फाउंडेशन, शासन व गाव विकास समिती यांच्या सहकाऱ्याने राबवून गावाचा सर्वांगीण विकास केला आहे.

गाव विकास समितीच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून गावात हरितक्रांती, वृक्ष लागवड, ठिबक सिंचन अंतर्गत पाणीपुरवठा, म्हैस पालन, अंतर्गत रस्ते, पथदिवे, हागणदारीमुक्त गाव, ओल्या सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन, निवृत्ती वेतन, शासकीय कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, महिला बचतगट, करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल शाळा व अंगणवाडी अशा अनेक उपक्रमातून हे गाव आदर्श गाव म्हणून साकारण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी पेणचे आमदार रविंद्र पाटील, तहसिलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, ग्रामपंचायत सरपंच श्रीमती स्वाती कदम, ग्रामसेवक अण्णा गोरड, स्वदेस फाउंडेशन संस्थेचे संचालक राहुल कटारिया, उपसंचालक तुषार इनामदार, महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, तालुका व्यवस्थापक शिवदास वायाळ, श्री.समीर शेख, श्री.रवींद्र राऊत, समन्वयक रितेश भोजकर, स्वदेस फाउंडेशन व इतर मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी गाव विकास समितीच्या अध्यक्षा सौ.अलका मांगले व सचिव नंदिनी मांगले तसेच युवा समिती सचिव अजिंक्य कुथे यांनी गावाचा आजपर्यंतचा प्रवास व स्वप्नातील गाव उभारण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यानुषंगाने केलेला प्रवास सविस्तरपणे सर्वांसमोर सादर केला. या कार्यक्रमात आमदार रविंद्र पाटील यांनी गावाने व विशेषतः महिलांनी घेतलेला सहभाग आणि गावाचा झालेला विकास याकरिता सर्व महिलांचे आभार व्यक्त केले.

तहसिलदार दिलीप रायण्णावार यांनी स्वदेस फाउंडेशनचे व गाव विकास समितीचे आभार मानले व स्वप्नपूर्तीसाठी सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच गटविकास अधिकारी विजय यादव यांनी महिलांची एकता हा मूळ गावाच्या विकासाचा पाया आहे, असे म्हणत गावाच्या स्वप्नपूर्ती जल्लोषाच्या कार्यक्रमाच्या सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.

स्वप्नातील गाव घोषित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, शिक्षक, गाव विकास समिती सदस्य उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक