“क्षयरोग रुग्णाला सामूदायिक साहाय्य समर्थन मोहीम” बळकट करण्यासाठी लायन्स क्लब व रोटरी क्लबच्या साहाय्याने जिल्हा क्षयरोग निर्मूलन कार्यालय सज्ज

अलिबाग, दि.28 (जिमाका):- सहसंचालक (कुष्ठ व क्षयरोग) पुणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार दि.27 जुलै 2022 रोजी जिल्हा क्षयरोग निर्मूलन कार्यालय येथे जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा पी.पी.एम.समन्वयक श्री.सतीश दंतराव यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील लायन्स क्लब व रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची टी.बी. रुग्णाला सामूदायिक साहाय्य समर्थन मोहीम" बळकट करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

क्षयरोग झालेल्या रुग्णाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. क्षयरोग झाल्यामुळे त्यांची भूक  मंदावते, जर रुग्ण गोळ्या जेवण न करता खात असेल तर त्यास इतर आजारही होऊ शकतात. त्यामुळे त्याला पोषण व सकस आहार असेल तर तो या आजारातून लवकरच बरा होऊ शकतो, आदी विषयांबाबत चर्चा संपन्न झाली.

विशेष साहाय्य म्हणून लायन्स व रोटरी क्लबकडून रुग्णाला सकस व पोषण आहार देण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन करून ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा क्षयरुग्णाला दत्तक घेण्यात येणार आहे. त्या रुग्णाचा उपचार संपेपर्यंत अंदाजे सहा महिने त्यांना सकस आहार दिला जाईल. तसेच त्या काळात त्यांना त्यांच्या क्षमता व पात्रतेनुसार रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. क्षयरोग याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यास सहकार्य करण्याचेही आश्वासन लायन्स व रोटरी क्लबकडून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या मोहिमेत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना सोबत घेवून जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी लायन्स क्लब व रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुधाकर मोरे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ठोकळ तसेच जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ.अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पी.पी.एम.समन्वयक श्री.सतीश दंतराव यांनी बैठकीत या अभियानाविषयी माहिती दिली.

यावेळी लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष लायन्स अविनाश राऊळ, लायन्स क्लब अलिबागचे सचिव लायन्स चंद्रहार शिंदे, रोटरी क्लब अलिबागचे अध्यक्ष श्री.निमीस परब यांची उपस्थिती होती.

शेवटी जिल्हा पी.पी.एम.समन्वयक श्री.सतीश दंतराव यांनी सर्वांचे आभार मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक